जादा डॉक्टर, आरोग्य कर्मचारी नियुक्त करा!
By admin | Published: November 20, 2015 02:44 AM2015-11-20T02:44:51+5:302015-11-20T02:44:51+5:30
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात डेंगीची साथ निर्माण झाली असून, सद्या नीरा शहरात डेंगीचे आठ रुग्ण असून, डेंगीसदृश तापाचे अकरा रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीने यावर
नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात डेंगीची साथ निर्माण झाली असून, सद्या नीरा शहरात डेंगीचे आठ रुग्ण असून, डेंगीसदृश तापाचे अकरा रुग्ण आहेत. ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना केल्या असून, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मात्र झोपलेलाच आहे. यामुळे आज झालेल्या बैैठकीत ग्रामस्थांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून नीरा शहरात डेंगीच्या रुग्णांचा सर्व्हे करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांना जाग आली. आज प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व ग्रामस्थांची बैैठक घेतली.
या वेळी डेंगी आजाराचे निर्मूलन होईपर्यंत आणखी जादा डॉक्टरांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य केंद्रात खास बाब म्हणून नियुक्ती करण्यात यावी, फॉगिंग मशिनद्वारा फवारण्यात येणाऱ्या औषधांचा रुग्ण कल्याण निधीतून पुरवठा करण्यात यावा, आवश्यकतेनुसार रुग्णांवर वाल्हे आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात यावे, अशा सूचना या वेळी करण्यात आल्या.
बैठकीला नीरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, बाळासाहेब भोसले, विजय शिंदे, रेवती भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक चव्हाण, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत अत्रे, स्थानिक पत्रकार यांच्याशिवाय ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)