अनुभवी असल्याने बिडकरांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:03+5:302020-12-12T04:28:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या सभागृह नेते पदी गणेश बिडकर यांची भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी (दि. ११) अधिकृतरित्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या सभागृह नेते पदी गणेश बिडकर यांची भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी (दि. ११) अधिकृतरित्या नियुक्ती केली़ भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत बिडकर यांना नियुक्त पत्र देण्यात आले़ मावळते सभागृह नेते धीरज घाटे यांना पुन्हा संघटनेत शहराचे प्रभारी म्हणून पदभार देण्यात आला आहे़
भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुळीक यांनी ही माहिती दिली़ यावेळी त्यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष पदाचा निर्णय योग्यवेळी जाहिर करू असेही सांगितले आहे़ सभागृह नेते म्हणून धीरज घाटे यांनी उत्तमपणे जबाबदारी पार पाडली आहे. अधिकाधिक सदस्यांना संधी मिळावी यासाठी कामकाजाचा अनुभव असलेले गणेश बिडकर यांना यावेळी संधी देण्यात आल्याचेही ते म्हणाले़
नवनियुक्त सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, “पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. समान पाणीपुरवठा, नदीसुधार प्रकल्प (जायका), कचरा व्यवस्थापन हे दीर्घकालीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्राथमिकता देणार आहे.”
दरम्यान, नगरसेवकांच्या बैठकीत शहराध्यक्ष मुळीक यांनी नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीत शहरात कमी मतदान झाले असले तरी, जिल्ह्यातून भाजपच्या उमेदवाराला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदार संघातील पराभवामुळे खचून न जाता २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले़ या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपचे ६ आमदार, नगरसेवक व भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.