Lokmat Impact: कात्रज-कोंढवा रस्त्यावर वाहतुक नियंत्रणासाठी ५० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रस्त्याच्या कामाला गती
By राजू हिंगे | Published: August 24, 2023 02:24 PM2023-08-24T14:24:00+5:302023-08-24T14:27:50+5:30
कात्रज - कोंढवा रस्त्यावर ५८ अपघातामध्ये २६ निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर अनेक जण गंभीर जखमी झाले
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीच्या नियत्रंणासाठी पोलिस विभागाने ५० वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी महावितरणकडून कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड यांना स्वतंत्र अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे.
कात्रज - कोंढवा रस्त्यावर ५८ अपघातामध्ये २६ निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. तर अनेक जण गंभीर त्या जखमी झाले आहेत. त्यामुळे या कात्रज-कोंढवा रस्त्याची दुरावस्था, खडडे आणि अपघात याबददल लोकमतने सातत्याने आवाज उठविला आहे. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साेमवारी कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी केली होती. रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण करण्यासह वाहतूक नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून १००, लोकसहभागातून २५ वॉर्डन आणि वाहतूक शाखेचे ५० पोलिस तातडीने नियुक्त करा, असे निर्देश दिल होते. यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसह; रस्त्याच्या आराखड्यातील महावितरणचे खांब, विद्युत तारा आणि डीपी आदींमुळे येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या.वाहतूक पोलीस आणि महावितरणच्या कार्यतत्परतेबद्दल पालकमंत्र्यांनी दोन्ही यंत्रणांचे अभिनंदन केले असून महावितरणचे खांब आणि विद्युत तारा हटवल्यानंतर एका मार्गिकेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.