झेडपी शाळांत हाेणार सेवानिवृत्त शिक्षकाची नियुक्ती; विद्यार्थी संघटनेकडून निर्णयावर नाराजी
By प्रशांत बिडवे | Published: October 19, 2023 10:35 AM2023-10-19T10:35:16+5:302023-10-19T10:35:23+5:30
सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहे हे एकप्रकारे पात्रताधारक बेराेजगारांच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार
पुणे: जिल्हा परिषद शाळांमध्ये रीक्त असलेल्या जागांवर तात्पुरत्या स्वरूपात वीस हजार रूपये मानधनांवर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहेत. यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेने झेडपी शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे समक्ष अथवा टपालाने येत्या २६ ऑक्टाेबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या झेडपीच्या या निर्णयाविराेधात विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये रीक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी नवीन शिक्षकास शाळेवर नियुक्ती देईपर्यंत स्थाानिक स्वराज संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांमधून वीस हजार रूपये वेतनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची पदे भरावेत असा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिला हाेता. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेनेही सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्यासाठी मंगळवारी दि. १७ राेजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
हा जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार
टेट- २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर हाेउन सात महिन्यांचा कालावधी झाला आहे. शिक्षण विभाग एकीकडे रीक्त शिक्षकांची पदे भरण्यासाठी दिरंगाई करीत असून दुसरीकडे सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहे हे एकप्रकारे पात्रताधारक बेराेजगारांच्या जखमेवर मीठ चाेळण्याचा प्रकार आहे. - संदिप कांबळे, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना