पूर्व हवेलीतील गावांसाठी अपर तहसीलदार म्हणून विजयकुमार चोबे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:31+5:302021-02-11T04:11:31+5:30
हवेली तालुक्याचे महसुली क्षेत्रफळ व कामाचा व्याप जास्त असल्याने नागरिकांची नेहमीच ओढाताण होत असते. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार ...
हवेली तालुक्याचे महसुली क्षेत्रफळ व कामाचा व्याप जास्त असल्याने नागरिकांची नेहमीच ओढाताण होत असते. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हवेलीचे महसुली विभाजन करावे, ही मागणी सातत्याने लावून धरली होती व शासनस्तरावर त्याचा पाठपुरावाही सुरू ठेवला. त्याचे सकारात्मक पाऊल पडताना दिसत असल्याने आमदारांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यानिमित्ताने हवेलीचे महसुली विभाजन करावे, या नागरिकांच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
पुणे विभागातील परिविक्षाधीन तहसीलदार यांना स्वतंत्र निवासी नायब तहसीलदार या पदावर पदस्थापना देण्यात आली होती. प्रस्तुतचा परिविक्षाधीन नायब तहसीलदार पदाचा २७ आठवड्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे विजयकुमार चोबे परिविक्षाधीन तहसीलदार यांना पूर्व हवेलीतील चार मंडलाधिकारी कार्यालयाचे अपर तहसीलदार या पदावर पदस्थापना देण्यात आलेली आहे. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांचेकडे कोथरुड, खडकवासला, खेड शिवापूर व हडपसर मंडलाधिकारी कार्यालयातील कार्यक्षेत्रातील नियमित तहसिलदार म्हणून कार्यभार राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली.
हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ, प्रलंबित महसूली प्रकरणे, तहसील कार्यालयातील अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या इत्यादी कारणांमुळे हवेलीतील नागरिकांना शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.प्रशासकीय कामकाजात हवेलीतील नागरिकांच्या अडचणी कायम वाढतच गेल्याने येथील नागरिकांनी पूर्व हवेलीचे महसुली विभाजन करून स्वतंत्र कार्यालयाची मागणी आमदार अशोक पवार यांचेकडे वारंवार केली होती.आमदार पवार यांनीही याची गरज लक्षात घेऊन शासनस्तरावर हा विषय उचलून धरला आहे. अपर तहसीलदार चोबे यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ असा असणार आहे.
अशोक पवार (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस) : हवेली तालुक्याचे क्षेत्रफळ राज्यातील काही जिल्ह्यांपेक्षाही जास्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आहे. त्यातच हवेलीतील पूर्व भागातील वाघोली, उरुळी कांचन,लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या गावांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. या भागात प्रशासकीय कामे राबवणेसाठी व नागरिकांच्या प्रश्र्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वंतत्र गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी व कायमस्वरुपी तहसिलदार,नायब तहसिलदार ह्या अधिका-यांची गरज आहे. त्यामुळे हवेलीचे महसूली विभाजन करून पूर्व हवेलीचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने स्वतंत्र तहसील कार्यालय पूर्व भागातच असावे, ही मागणी शासनस्तरावर व पालकमंत्री यांचेकडे केलेली आहे. स्वतंत्र कार्यालय झाल्यास संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची नव्याने पदनियुक्ती होईल.
युगंधर काळभोर ( माजी उपसभापती पंचायत समिती हवेली ) - सदर निर्णय स्वागतार्ह असून यापूर्वी पूर्व हवेलीतील पन्नास महसुली गावांतील कार्यक्षेत्रातील नागरिकांना शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. प्रशासकीय कामकाजात वेळ लागत असल्याने हवेलीतील नागरिकांच्या अडचणी वाढत होत्या. यामुळे कामे लवकर होतील. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. विद्यमान आमदार अशोक पवार यांचे माध्यमातून पाठपुरावा करून सदर तहसील कार्यालय याच भागात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.