शिंदे गटाच्या जागांवरही भाजपकडून प्रमुखांच्या नियुक्त्या; मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ
By राजू इनामदार | Published: June 8, 2023 05:29 PM2023-06-08T17:29:38+5:302023-06-08T17:30:03+5:30
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी
पुणे: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत, मात्र त्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघ व ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी मतदारसंघ प्रमुख म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. मात्र यात शिवसेनेच्या ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदं गट) जागांचाही समावेश असल्याने मुख्यमंत्री समर्थक अस्वस्थ झाले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ् बावनकुळे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. या प्रमुखांवर त्यांना दिलेल्या मतदारसंघाची निवडणूक विषयक सर्व जबाबदारी देण्यात आली आहे. मतदारांबरोबर नियमीत संपर्क, पक्षाची धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्यांची नाव, पत्त्यासहित यादी, पदाधिकाऱ्यांच्या नियमीत बैठका, त्यांच्या कामाचा आढावा अशी कामांची जंत्रीच या पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यातून त्यात्या मतदारसंघात पक्षाचे संघटन व त्या माध्यमातून राजकीय शक्ती वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मात्र यात त्यांच्याबरोबर युती असलेल्या मुख्यमंत्री शिंदे गटाकडे असणाऱ्या मतदारसंघांचाही समावेश आहे. पुणे जिल्ह्यात मावळ, बारामती, शिरूर, पुणे असे ४ लोकसभा मतदारसंघ येतात. त्यातील मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात आहेत. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव हेही शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी या जागा साहजिकच शिंदे गट मागणार आहे. तिथे भाजपने मावळसाठी प्रशांत ठाकूर तर शिरूरसाठी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती केली आहे.
पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुरूवातीपासूनच शिंदे गटाची साथ दिली आहे. तिथे भाजपने बाबाराजे जाधवराव यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. शिंदे गटाने जिल्ह्यातील आणखी काही मतदारसंघांवर दावा केला आहे, मात्र तिथेही भाजपने नियुक्त्या दिल्याच आहेत. शिंदं समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते यामुळे अस्वस्थ झाले आहेत. विशेषत: मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील बारणे, आढळराव समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भाजपचे काम आमच्या मतदारसंघात वाढले तर मग आम्ही कोणते काम करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
''अशा नियुक्त्याने काही फरक पडेल असे मला वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे यापुढच्या सर्व निवडणूका आम्ही युती म्हणून लढणार असे जाहीर केले आहे. युती असली तरी आम्हा दोघांनाही आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहेच. जागा वाटप झाल्यावर तिथे आमची एकमेकांना मदतच होणार आहे. किरण साळी- राज्य सचिव, युवा सेना, शिंदे गट''