पोलिसांची कार्यतत्परता अन् माणूसकी, प्रवाशाला शोधून परत केले 11 हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:58 AM2020-08-24T11:58:17+5:302020-08-24T12:00:02+5:30
खेड तालुक्याच्या हद्दीत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा पोलिसांकडून जलद गती प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत होती.
पुणे - कोरोना महामारीच्या काळात देशातील, राज्यातील पोलिसांनी आपल्या कामातून नागरिकांची मने जिंकली आहेत. एरवी, पोलीस म्हणजे पुढारी आणि पैसेवाल्यांच्या मर्जीतले असा समज अनेकांचा बनला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची कित्येक उदाहरणे समाजसमोर, मीडियात आली आहे. खाकी वर्दीतला माणूस आपण लॉकडाऊनमध्ये अनुभवला, हाच माणूसकी जपणारा प्रसंग खेड तालुक्याच्या हद्दीत घडला आहे. 11 हजार रुपयांची रक्कम असलेले एका प्रवाशाचे पाकीट पोलिसांनी त्याला गाठून परत केले.
खेड तालुक्याच्या हद्दीत पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा पोलिसांकडून जलद गती प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत होती. दरम्यान, महामार्ग पोलिसांना त्या ठिकाणाहून जाणार्या दुचाकीस्वाराच्या खिशातून पैशाचे पॉकीट रस्त्यावर पडल्याचे दिसले. पोलिसांनी ते पाकीट ताब्यात घेईपर्यंत तो व्यक्ती पुढे निघून गेला होता. त्यामुळे, पोलिसांनी ते पॉकिट चेक केले असता, त्यामध्ये रोख 11 हजार रुपये, आधार कार्ड आणि इतर महत्त्वाच्या वस्तू आढळून आल्या. आता, मोठी रक्कम या पाकिटात असल्याने ते पाकीट संबंधत प्रवाशाला तत्काळ मिळावे, यासाठी तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी प्रयत्न केले.
पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी तात्काळ तेथील पोलीस हवालदार शंकर कोंढारे, चालक संतोष पठारे यांना त्या व्यक्तीच्या मागावर पाठवून दिले. पोलीस हवालदार शंकर कोंढारे, चालक संतोष पठारे यांनी दुचाकीस्वार दादासाहेब जाधव यांचा पाठलाग करुन त्यांना शोधले. घटनास्थळावर बोलावून घेत पॉकिटाबाबत खात्री केली. त्यानंतरच, त्यांचे पॉकिट, रोख रक्कम आणि इतर सर्व वस्तू दादासाहेब यांना परत केल्या. विशेष म्हणजे दादासाहेब जाधव यांना त्यांचे पॉकीट पडल्याची कल्पनादेखील नव्हती. मात्र, पोलिसांनी ते मला शोधून परत केल्याचा आनंद व्यक्त करताना ते भारावले होते, पोलिसांच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले.