पोलिसांचे कौतुक; पण सरकारची वागणूक संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:49+5:302021-09-09T04:15:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी जलद तपास करून आरोपींना ताब्यात घेतले, ही ...

Appreciation of the police; But the government's behavior is questionable | पोलिसांचे कौतुक; पण सरकारची वागणूक संशयास्पद

पोलिसांचे कौतुक; पण सरकारची वागणूक संशयास्पद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी जलद तपास करून आरोपींना ताब्यात घेतले, ही कामगिरी कौतुकास्पद आहे. मात्र माजी मंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण प्रकरणी पुणे पोलिसांची हीच कार्यक्षमता कुठे गेली होती,’ असा प्रश्न भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. औरंगाबादच्या मेहबूब शेख प्रकरणीही सरकारची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस दबावात काम करतात, असा आरोपही त्यांनी केला.

मान शरमेने खाली घालावी अशी घटना पुण्यात घडली. पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. रेल्वे पोलिसांचेही कौतुक करावे लागेल. पोलिसांनी तातडीने चौदा आरोपींना ताब्यात घेतल्याने समाजात चांगला संदेश गेला, असे वाघ म्हणाल्या. बुधवारी (दि. ८) त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

वाघ म्हणाल्या की, चौदा जणांच्या मुसक्या आवळल्या जाणे फार महत्त्वाचे आहे. यातून समाजात चांगला संदेश जाईल. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक आहे. मात्र दत्तवाडीत दोन महिन्यांपूर्वी जे घडले त्याच्या तपासाचे काय? नागपुरात गतिमंद मुलीवर रात्रीत दोनदा सामूहिक बलात्कार झाला त्याचे काय, अशा काही घटना घडल्या की द्रुतगती न्यायालयाची मागणी केली जाते. पण किती मुलींना या न्यायालयांमधून न्याय मिळाला, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

‘प्रत्येक सरकारच्या काळात महिला, मुलींवर अत्याचार होतात. भाजपचे सरकार आल्यानंतर एका मिनिटात हे सगळे थांबेल असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण सरकार काय भूमिका घेते हे महत्त्वाचे असते’, असे वाघ म्हणाल्या. याच पुणे पोलिसांना संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी तपास करता आलेला नाही. या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात गेलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

आम्ही तडस यांच्या सुनेसोबत

भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने कौटुंबिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या बाबतीत आम्ही तिच्यासोबत होतो आणि राहू असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. पुण्यातील कदमवाक वस्ती येथील महिला सरपंचांवर हात उचलण्याचा हिम्मत होते कशी? या घटनेनंतर या वस्तीतले लसीकरण जिल्हा परिषदेने का थांबवले, असे विचारून त्या म्हणाल्या, ‘अजित पवार यांचा दरारा मोठा आहे. ते काय करतात? महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे.’

चौकट

बीडमध्ये गुंडाराज

‘कोठेही जाऊ देण्यापासून, बोलण्यापासून कोणाला रोखणे बरोबर नाही. बीडमध्ये पोलीस बळाचा गैरवापर झाला. बीडमध्ये गुंडाराज आहे,’ अशी टीका चित्रा वाघ यांनी करुणा शर्मा यांच्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना केली. त्या बॉम्ब फोडायला गेल्या होत्या का, दहशतवादी होत्या का? त्यांची सख्खी बहीण रेणू शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. ही महिला खोटे बोलत असेल तर तिच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल वाघ यांनी केला.

Web Title: Appreciation of the police; But the government's behavior is questionable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.