अन्नसेवेच्या कार्याचे कुलगुरूंकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:57+5:302021-05-20T04:11:57+5:30
पुणे : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका रुग्णांचे नातेवाईक यांना अन्नसेवा देणाऱ्या विद्यार्थी सहायक समितीच्या कार्याचे सावित्रीबाई फुले पुणे ...
पुणे : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, परिचारिका रुग्णांचे नातेवाईक यांना अन्नसेवा देणाऱ्या विद्यार्थी सहायक समितीच्या कार्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडून कौतुक करण्यात आले. दररोज जवळपास अकराशे लोकांचे दोन वेळचे जेवण समितीमार्फत दिले जात आहे.
ग्रामीण भागातल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी १९५५ पासून काम करणाऱ्या विद्यार्थी सहायक समिती आणि माजी विद्यार्थ्यांकडून कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांना रोज दोन वेळचे जेवण विनामूल्य दिले जाते. मागील वर्षीही लॉकडाऊनच्या काळात समितीच्या माजी विद्यार्थ्यांमार्फत जवळपास सव्वा लाख बेघर, देवदासी, गरीब लोकांना अन्नसेवा दिली होती. या वर्षीही हा उपक्रम राबविला जात आहे. संगणकतज्ज्ञ व समितीचे माजी विश्वस्त डॉ. दीपक शिकारपूर यांच्याकडून बुधवारी (दि.१९) एक दिवसाच्या जेवणाचा खर्च देण्यात आला.
डॉ. करमळकर व डॉ. शिकारपूर यांनी समितीच्या कार्यालयाला भेट देऊन समितीच्या कामाचे कौतुक केले. या वेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, विश्वस्त तुषार रांजनकर आदी उपस्थित होते.
अन्नसेवा कार्याबाबत माहिती देताना तुकाराम गायकवाड म्हणाले, मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व अन्य कर्मचारी यांची जेवणाची सोय असते. परंतु, ज्या ठिकाणी ही पुरेशी सोय नाही, अशा हॉस्पिटलमध्ये आम्ही हे शिजवलेले अन्न देत आहोत. यावर्षी २७ एप्रिलपासून या कामाला सुरुवात केली असून लॉकडाऊन संपेपर्यंत हे कार्य सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.
–------