Baramati| बारामतीत 'जलजीवन मिशन'च्या दुसऱ्या टप्यातील १०३ कोटींच्या योजनेला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:27 PM2022-02-03T16:27:12+5:302022-02-03T16:29:17+5:30
जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्यातील १०३ कोटींच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे...
बारामती: बारामती तालुक्यात जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्यातील १०३ कोटींच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील १२ गावे ५८ वाडया / वस्त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. यापूर्वी जिरायती भागातील ३३९ कोटी रुपये खर्चाच्या ६० गावांच्या ७ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे.
दोन टप्प्यात एकुण ४४२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या जिरायती भागासह बागायती भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. बारामती तालुका पुनर्विलोकन व एकात्मिक विकास समन्वय समितीचे अध्यक्ष, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बारामती उपविभाग उपअभियंता तन्मय कांबळे यांनी याबाबत माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून १२ गावे ५८ वाडया / वस्त्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १०३ कोटी रक्कमेच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. योजनांची आखणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेमार्फत करण्यात आलेली होती. या योजनेसाठी पाटबंधारे विभागाकडील जागा साठवण तलाव, जलशुध्दीकरण केंद्र व उंच जलकुंभ यासाठी जागा संपादित करण्यात आली आहे.
तसेच निरा-डावा कालवामधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी पाटबंधारे खात्याने रितसर परवाना दिला आहे. तसेच या सर्व योजनांसाठी साठवण तलाव, मुख्य संतुलन पाणी टाकी, जलशुध्दीकरण केंद्र, वितरण व्यवस्था, उंच जलकुंभ, पंपहाऊस इ. बाबी बरोबर सदरचे योजनेसाठी सौर उर्जाद्वारे विज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे योजना विज देयकावरील ग्रामपंचायतीचा खर्च कमी प्रमाणात येणार आहे.
मंजुरी मिळालेल्या योजना आणि निधीनिहाय माहिती पुढीलप्रमाणे- माळेगांव खुर्द पाहुणेवाडी नळपाणी पुरवठा योजना - १७.४० कोटी, होळ - सस्तेवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना- २८.२६ कोटी, गडदरवाडी - खंडोबाचीवाडी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - ११.९५ कोटी , पिंपळी - कन्हेरी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना - १७.९९ कोटी, करंजेपुल - सोरटेवाडी प्रादेशिक नळपाणीद पुरवठा योजना २८.०६ कोटी.