रुग्णवाहिकांसाठी ७३ वाहनचालकांच्या कंत्राटी नियुक्तीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:15+5:302021-08-26T04:14:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांसाठी ७३ वाहनचालकांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्तीला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकांसाठी ७३ वाहनचालकांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्तीला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेने मान्यता दिली आहे. ग्रामीण भागात १२४ प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहेत. त्यातील १०१ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. त्यात ९३ रुग्णवाहिका असून, ९३ कंत्राटी वाहनचालकांचे मानधन राज्य सरकारच्या निधीतून दिले जाते. यासाठी ७३ कंत्राटी वाहनचालक नेमण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
कोरोनाच्या संकटकाळात १४ व्या वित्त आयोगातून ७७ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. कोरोनाग्रस्तांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आरोग्य केंद्र स्तरातून रुग्णकल्याण समितीच्या शिफारशीवरून कंत्राटी वाहनचालकांची नियुक्ती केली आहे. सध्या ६३ कंत्राटी वाहनचालकांचे मानधन हे ग्रामविकास विभागाकडून मंजूर केलेल्या दोन कोटी रुपयांच्या रकमेतून दिले जात आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना १७४ रुग्णवाहिका सेवा देत आहेत. त्यांपैकी चार रुग्णवाहिका कंपन्यांचे उत्तरदायित्व (सीएसआर) निधी आणि आमदार निधीतून दिले आहेत. त्यातील १०१ वाहनचालक पदे मंजूर असून ७३ पदे तात्पुरती मंजूर करणे गरजेचे होते.
रुग्णवाहिकांसाठी वाहनचालक गरजेचे आहे. त्यांना दरमहा १४ हजार २०० रुपयांचे वेतन दिले जात आहे. त्यासाठी खासगी एजन्सीकडून हे मानधन चालकांच्या खात्यात जमा केले जाते. त्याकरिता त्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसह आदी रक्कम कपात केली जाते. त्या अनुषंगाने १७ हजार ५०० रुपयांची एकूण रक्कम एका चालकामागे एजन्सीला जिल्हा परिषदेकडून देण्यात येते.
बांधकाम व आरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाने प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही कंत्राटी चालकांच्या नियुक्तीच्या मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला.