‘इंदापूर’साठी उजनीतून पाच टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:52+5:302021-04-24T04:09:52+5:30
पाणीप्रश्न सुटणार मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती कळस : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेतीसिचंन व निरा ...
पाणीप्रश्न सुटणार
मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
कळस : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील शेतीसिचंन व निरा डावा कालव्यावरील बावीस गावांतील शेतीसाठी उजनी जलाशयातून पाच टीएमसी पाणी उचलण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता तालुक्यासाठी हा एैतिहासिक निर्णय असल्याने शेतीला अच्छे दिन येणार आहेत.
या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाली आहे. जलसंपदा मंत्रालयाने याबाबत शासन निर्णय पारित केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खडकवासला कालव्यावरील शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत ३६ गावांना उन्हाळी आवर्तनात टंचाई निर्माण होत होती. तसेच निरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी राज्यमंत्री भरणे प्रयत्नशील होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजनाखाली गेल्या काही वर्षांपासून मंत्री भरणे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री भरणे यांच्या प्रयत्नान यश आले आहे. दि २२ एप्रिल रोजी या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अंतिम स्वाक्षरी झाली आहे. सदर योजनेसाठी येथील जनतेची आग्रही मागणी होती. याबाबत माहिती देताना मंत्री भरणे यांनी सांगितले, कुंभारगाव परिसरातील उजनी जलाशयातून १० हजार एच. पी. क्षमतेच्या विदयुत पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. ते पाणी सुमारे १० कि. मी. अंतरावरील शेटफळगढे परिसरातील खडकवासला कालव्यात टाकले जाणार आहे. तेथून हे पाणी खडकवासला कालव्यातून बेडसिंगेपर्यंतच्या शेती सिंचनासाठीही पाणी वापरले जाणार आहे. सणसर जोड कालवातून नीरा डाव्या कालव्यावरील बावीस गावातील शेती सिंचनासाठी वापरले जाणार आहे. दोन्ही कालव्यावरील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. सदर योजनेसाठी सुमारे ६०० कोटी रुपयेचा निधी खर्च होणार आहे. या योजनेसाठी दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.
...तालुक्यातील सिंचन
प्रश्न सुटणार
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली आहे. चार महिन्यांत योजनेचा सर्व्हे तातडीने पूर्ण केला जाणार आहे. लाकडी निंबोडीनंतर हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे तालुक्यातील सिंचन प्रश्न सुटणार आहे.
दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री