पुणे ते अहिल्यानगरसह शिर्डी, नाशिक या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:24 IST2024-12-30T13:24:00+5:302024-12-30T13:24:10+5:30
एकूण २४८ किमीपैकी १७८ किमीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ७० कि. मी.चे काम प्रगतीपथावर

पुणे ते अहिल्यानगरसह शिर्डी, नाशिक या नवीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणास मान्यता
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित पुणे ते अहिल्यानगर (अहमदनगर), साईनगर शिर्डी ते पुणतांबा आणि साईनगर शिर्डी ते नाशिक या तीन रेल्वेमार्गांच्या सर्वेक्षणास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. तसेच नगर शहर - पुणे - नाशिक दरम्यानची रेल्वे जोडणी सुधारण्यासाठी २४८ किमी लांबीच्या दौंड - मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण २४८ किमीपैकी १७८ किमीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ७० कि. मी.चे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय तीन नवीन दुहेरी रेल्वेमार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
नाशिक - साईनगर शिर्डी (८२ किमी), पुणे - अहमदनगर (१२५ किमी) दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी - पुणतांबा (१७ किमी) दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, पुणे आणि नाशिक यांच्या थेट जोडणीसाठी डीपीआर महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाने तयार केला आहे. हा महाराष्ट्र सरकार (५० टक्के) आणि रेल्वे मंत्रालय (५० टक्के) यांचा संयुक्त उपक्रम आहे. डीपीआरमधील प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जात आहे. जेथे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स यांनी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळा स्थापन केली आहे.