आॅटो रिक्षांना सीएनजी किटसाठी अखेर अनुदान देण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 08:17 PM2018-07-17T20:17:47+5:302018-07-17T20:26:26+5:30
शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी सात वर्षांपासून पुणे मनपाअंतर्गत सीएनजी किटसाठी अनुदान देण्यात येत आहे.
पुणे : शहरातील हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी तीन चाकी आॅटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपये डीबीटी पध्दतीने देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.
शहरातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने सीएनजी किट बसविलेल्या आॅटो रिक्षांना साहाय्य अनुदान देण्यात येते. हरित इंधनाचा वापर वाढवा व शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासाठी सात वर्षांपासून पुणे मनपाअंतर्गत सीएनजी किटसाठी सहाय्य अनुदान देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या वर्षीच्या अंदाजपत्रकात सीएनजी किटसाठी एक कोटी रुपये इतकी तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. सीएनजी किटकरिता प्रत्येक रिक्षामालकाच्या नावे बारा हजार रुपये साहाय्य अनुदान देण्याबाबत मुख्य सभेने २३ आॅगस्ट २०११ अन्वये धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. यावर्षी ८३३ रिक्षांना या अनुदानाचा लाभ होणार आहे.
यासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच अनुदान वाटपाची कागदपत्रे एकत्रित ठेवणे, त्यामध्ये रिक्षांचे आर. सी. पुस्तकाची झेरॉक्स, प्रस्तावांची तपासणी, आरटीओकडे असलेल्या माहितीबरोबर जुळवून पडताळणी करणे, प्रस्तावांच्या रकमेचे बिल मनपाच्या आॅडिटकडे सादर करणे व रिक्षा परमिट धारकास डीबीटी पध्दतीने अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करणे इत्यादी सर्व बाबी अनुदानाच्या प्रक्रियेसाठी जुन्या रिक्षांपासून होणारे प्रदूषण कमी करणेसाठी त्यांना सीएनजी किट वापरण्यास प्रोत्साहन देणे या हेतूने पुणे मनपा अंतर्गत नवीन परमिट देण्यास सुरुवात केली असल्याने नवीन रिक्षांची संह्यया वाढली आहे व या सर्व रिक्षांमध्ये सीएनजी किट आहे. तसेच सर्व नवीन रिक्षांना आरटीओ रजिस्ट्रेशनसाठी सीएनजी असे बंधनकारक झाले आहे.
मागील वर्षी सन २०१७-१८ मध्ये आॅनलाईन पध्दतीने अनुदानाचे अर्ज मागविण्यात आले होते व यामध्ये ४६०० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी उपलब्ध तरतूद रुपये २५ लाखांमध्ये २०८ रिक्षांना डीबीटी पध्दतीने अनुदान देण्यात आले. मागील वर्षाचे ४३९२ अर्ज पुणे मनपाकडे उपलब्ध आहेत. या सर्व अजार्चे विश्लेषण केले असता रिक्षा घेतल्यानंतर बाहेरून सीएनजी किट बसविलेल्या जुन्या रिक्षांची संख्या ८३० आहे.