वाढीव अंदाजपत्रकाला मंजुरी

By admin | Published: December 22, 2015 01:39 AM2015-12-22T01:39:19+5:302015-12-22T01:39:19+5:30

महापालिका शिक्षण मंडळाच्या मागील वर्षाच्या तुलनेत ५५ कोटी रुपयांनी वाढीव असलेल्या २०१६-१७ या वर्षाच्या ३४१ कोटी रुपयांच्या बजेटला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली

Approval of increased budget | वाढीव अंदाजपत्रकाला मंजुरी

वाढीव अंदाजपत्रकाला मंजुरी

Next

पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या मागील वर्षाच्या तुलनेत ५५ कोटी रुपयांनी वाढीव असलेल्या २०१६-१७ या वर्षाच्या ३४१ कोटी रुपयांच्या बजेटला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. पुढील शैक्षणिक वर्षापासून निवडक १७ शाळांमध्ये मॉडेल स्कूल प्रोजेक्ट राबविण्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आयुक्तांची गुणवत्तावाढ योजना, सर्व शाळांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविणे, ई-लर्निंग स्कूल अद्ययावत करणे, विज्ञान केंद्र यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शहरामध्ये ३०० शाळा चालविल्या जातात. शिक्षण मंडळाचे चालू वर्षासाठी २८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. आगामी २०१६-१७ या वर्षासाठी शिक्षण मंडळाने ३३४ कोटी ७७ लाख रुपयांचे बजेट सादर केले होते. त्यामध्ये आयुक्तांनी १७ कोटी रुपयांची काटछाट सुचविली होती. स्थायी समितीसमोर हे अंदाजपत्रक मांडण्यात आले असता मागील समितीने त्यामध्ये ५५ कोटी रुपयांनी मोठी वाढ करून ३४१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली असल्याची माहिती समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली.
या वेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष वासंती काकडे उपस्थित होत्या. कदम यांनी सांगितले की, ‘यंदाच्या वर्षी १७ शाळा या मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. या शाळांमधील वर्ग, शिक्षक कक्ष, सभागृह, माईक सिस्टिम या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. शाळेच्या वेळेचे काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे. केवळ ५ तास हे अध्यापनासाठी असतील. उर्वरित वेळेमध्ये इतर उपक्रम राबविले जाणार आहेत. एका शाळेवर २० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.’
रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळण्याची शक्यता असून, त्यांच्या पगारासाठी २ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. आठवीच्या वर्गासाठी १९ ठिकाणी प्रयोगशाळा उभारण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. क्रीडानिकेतन शाळांच्या अल्पोपाहार व भोजन व्यवस्थेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ई-लर्निंग स्कूल अद्ययावत करण्यासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. विद्यार्थी गणवेशासाठी ११ कोटी, रेनकोटसाठी २ कोटी व स्वेटरसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: Approval of increased budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.