पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी; दोन्ही शहरांच्या विकासाला चालना - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:06 PM2023-02-05T18:06:42+5:302023-02-05T18:27:46+5:30
पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग प्रस्तावित
नितीश गोवंडे
पुणे: भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली. केंद्र शासनाच्या अंतिम मंजूरीसाठी हा प्रकल्प थांबला होता, आता मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच पुणे - नाशिक रेल्वे प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल असे मत देखील व्यक्त केले आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात या रेल्वेमार्गाला मंजूरी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. रेल्वे मंत्रालयाने आता हा हायस्पीड रेल्वे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी आवश्यक १ हजार ४५० हेक्टरपैकी ३० हेक्टर पेक्षा अधिक खासगी जागा संपादन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमआरआयडीसीएल) देण्यात आली. तसेच सरकारी आणि वन जमीन संपादनाचीही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
पुणे – नाशिक असा थेट रेल्वे मार्ग नसल्याने पुणे किंवा नाशिक गाठण्यासाठी मुंबईला येऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे प्रवासासाठी सहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रवास वेळ कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा रेल्वे मार्ग पुणे - अहमदनगर - नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकर्यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधा देखील यामुळे निर्माण होणार आहे.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मी मा. केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल. @AshwiniVaishnawpic.twitter.com/hcAo1RfusG
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 5, 2023
कशी असेल हायस्पीड रेल्वे..
- १६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प (राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने)
- २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग
- पुणे - अहमदनगर - नाशिक जिल्ह्यांना जोडणार
- २०० किलोमीटर प्रतितास वेग (पुढे हा वेग २५० किलोमीटरपर्यंत वाढवता येणार आहे)
- पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या पावणेदोन तासात कापता येणार
- पुणे - नाशिकदरम्यान २४ स्थानके, १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल व १२८ भुयारीमार्ग प्रस्तावित
- भूसंपादन झाल्यानंतर विद्युतीकरणासह एकाचवेळी दुहेरी मार्गाचे काम होणार
- पुणे ते मांजरी एलिव्हेटेड (पुलावरून)
- मांजरी ते नाशिक जमिनीवरून हायस्पीड रेल्वे धावणार