दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:10+5:302021-01-20T04:13:10+5:30
पुणे : पुणे महापालिकेच्या महाविद्यालयातील दहावी आणि बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे १ लाख ८१ हजार रुपये ...
पुणे : पुणे महापालिकेच्या महाविद्यालयातील दहावी आणि बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे १ लाख ८१ हजार रुपये परिक्षा शुल्क भरण्याला स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे महापालिकेच्या ४३ शाळा आणि ५ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क भरण्यास अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यातून १०५ विद्यार्थ्यांचे १ लाख ८१ हजार १२५ रुपये परिक्षा शुल्कापोटी एसएससी आणि एचएससी बोर्डात भरण्यास मान्यता देण्यात आली.
येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले प्रशाला, मंगळवार पेठेतील बाबुराव सणस प्रशाला, भवानी पेठेतील रफी अहमद किडवई ऊर्दू हायस्कूल, येरवडा येथील हकीम अजमलखान उर्दू विद्यालयातील १०५ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.