जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:50 AM2018-12-14T02:50:23+5:302018-12-14T02:50:41+5:30
आठवड्यात मिळणार पंचायत समित्यांना आदेश; १२ वर्षांनतर मिळाला लाभ
बारामती : जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या मागील वर्षभरापासून रखडलेल्या वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्तावास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. याबाबत आठवडाभराच्या कालावधीत जिल्ह्यातील पंचायत समित्यांना आदेश देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिक्षकांना प्रत्येक १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळतो. हा वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ नेहमीच्या वेतनवाढीशिवाय असतो; मात्र जिल्ह्यातील ६३४ शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव रखडला होता.
१२ वर्षं सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येते. वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीची शिक्षकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. जिल्हा परिषदेतील खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, बारामती, भोर, शिरूर, दौंड, मुळशी, मावळ, पुरंदर, इंदापूर तालुक्यांतील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये सादर होऊनही मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत. सातत्याने प्रशासनाकडे मागणी करूनही प्रस्ताव मंजूर होत नसल्याने शिक्षकांमधून नाराजी होती. या निर्णयाचे स्वागत जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे.
...तर जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई
वरिष्ठ वेतनश्रेणी शिक्षकांना देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी तत्काळ सेवा पुस्तकामध्ये नोंद करावी. एक महिन्याच्या आत प्रत्यक्ष पगारात लाभ देण्यात यावा; अन्यथा संबंधित पंचायत समितीमधील जबाबदार कर्मचाºयांविरोधात कारवाईचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. यामुळे शिक्षकांना दिलासा मिळाल्याचे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मारणे यांनी सांगितले.
शिक्षकांना नवीन वर्षाची भेट ...
१२ तालुक्यांतील ६३४ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे. शिक्षकांचे अन्य प्रलंबित प्रश्नही तत्काळ मार्गी लावले जातील, शिक्षकांना ही नवीन वर्षाची भेट आहे.
- विवेक वळसे-पाटील
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे