शिवाजीनगर-औंध बीआरटीला मंजुरी

By admin | Published: December 28, 2016 04:40 AM2016-12-28T04:40:18+5:302016-12-28T04:40:18+5:30

शिवाजीनगर येथील सिमला आॅफिस चौक ते औंधचा राजीव गांधी पूल, पाटील इस्टेट ते हॅरिस ब्रिज, संगमवाडी ते मनपा या मार्गांवर बीआरटीची उभारणी करणे तसेच सातारा

Approval of Shivajinagar-Aundh BRT | शिवाजीनगर-औंध बीआरटीला मंजुरी

शिवाजीनगर-औंध बीआरटीला मंजुरी

Next

पुणे : शिवाजीनगर येथील सिमला आॅफिस चौक ते औंधचा राजीव गांधी पूल, पाटील इस्टेट ते हॅरिस ब्रिज, संगमवाडी ते मनपा या मार्गांवर बीआरटीची उभारणी करणे तसेच सातारा बीआरटीची पुनर्बांधणी करणे आदी २३४ कोटी रुपयांच्या कामांना मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
शहरामध्ये बीआरटीचे जाळे उभारण्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत सिमला आॅफिस चौक ते औंधमधील राजीव गांधी पुलापर्यंत बीआरटी मार्गांची उभारणी होणार आहे. त्याबरोबर पाटील इस्टेट ते हॅरिस ब्रिज या मार्गावर तसेच संगमवाडी ते पुणे मनपापर्यंत बीआरटी मार्ग विस्तारीत केला जाणार आहे. नागरिकांना बसमधून कमीत कमी वेळात इच्छित ठिकाणी पोहोचता आल्यास त्यांच्याकडून बसचा वापर वाढेल, या हेतूने बीआरटी मार्गांचे जाळे वाढविण्यास प्राधान्य दिले जात आहे. बस वाहतूककोंडीमध्ये न अडकता वेगाने प्रवास करू शकल्यास जास्तीत जास्त नागरिक बसप्रवासाकडे वळू शकणार आहेत.
संगमवाडी ते विश्रांतवाडी तसेच नगर रोड बीआरटी यशस्वी पद्धतीने कार्यान्वित झाल्यानंतर आता पुढच्या बीआरटी मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. ५ वर्षांमध्ये ही कामे पूर्ण केली जाणार असून, यासाठी १६५ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. आगामी निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या सत्ताधाऱ्यांसमोर या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.(प्रतिनिधी)

७० कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च येणार
सातारा रोड बीआरटी मार्गाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, त्यासाठी ७० कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. या मार्गावरील बसस्टॉप बीआरटी मार्गांच्या मध्ये घेणे, फुटपाथ व सायकल ट्रॅकची पुनर्बांधणी आदी कामे केली जाणार आहेत.
सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाची उभारणी २००६-०७ मध्ये करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षांत या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर दोन ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आल्याने फुटपाथ व सायकल ट्रॅकची मोडतोड झाली आहे. काही ठिकाणी लेनमध्ये बदल झालेला आहे.
या बीआरटी मार्गावर बसस्टॉप रस्त्याच्या कडेला बसविण्यात आले आहेत. ते मध्यभागी घेणे आवश्यक आहेत. ही सर्व दुरुस्तीची कामे करून बीआरटी मार्गाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे काम एम. बी. पाटील कन्स्ट्रक्शन यांना देण्याचा निर्णय स्थायी समितीकडून घेण्यात आला.

Web Title: Approval of Shivajinagar-Aundh BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.