नियतकालिकांच्या वितरणासाठी पोस्टाकडून विशेष सवलतींना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:03+5:302021-05-30T04:10:03+5:30
पुणे : सध्या संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात ...
पुणे : सध्या संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नियतकालिकांची छपाई आणि वितरण करण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, याकरिता अखिल भारतीय मराठी नियतकालिक परिषदेने पोस्ट विभागाकडे आग्रही मागणी केली होती, त्यातील सर्व बाबींना मान्यता मिळाली असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस भालचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
केंद्रीय दळणवळण मंत्री रवी शंकर प्रसाद व केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व मंजुरी मिळवून दिली आहे. यासंदर्भात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी देखील प्रकाशकांच्या अडचणी सोडवल्या जाव्यात यासाठी विशेष पाठपुरावा केला होता, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
दिल्ली येथील पोस्ट विभागाच्या उपमहासंचालिका सुकृती गुप्ता यांनी जारी केलेल्या आदेशानुसार मार्च ते जुलै या ५ महिन्यांसाठी ऑगस्ट महिन्यापर्यंत कधीही वितरण करता येणार आहे. त्यामध्ये वितरणाच्या तारखेचे बंधन नसेल, जोड अंक काढता येईल तसेच अंक प्रकाशित झाला नसल्यास दंडात्मक कारवाई होणार नाही, तर वाढीव दराने पोस्टेज भरण्याची गरज आता राहिलेली नाही.
------------------------------
चौकट
कोरोनाची परिस्थिती वाढत असल्याने अनेक प्रिंटिंग प्रेस बंद आहेत, कागद उपलब्ध होत नाहीत, बांधणी यंत्रणा बंद आहेत याचा विचार करता अनेक प्रकाशकांना अंक तयार करता येत नाही किंवा वेळेत पोस्टात देता येत नाही. त्याचबरोबर जाहिराती मिळत नसल्याने प्रकाशकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या सर्वाचाच परिणाम म्हणून सुमारे 14 ते 15 हजार नियतकालिके सध्या नियमितपणे प्रसिद्ध केली जात नाहीत. महाराष्ट्रात एकूण 20 हजार नोंदणीकृत नियतकालिके आहे, त्यापैकी सध्या सुमारे 5 हजार नियतकालिके सुरू असून त्यातील 4 हजार नियतकालिकांकडे पोस्ट सवलतीचा परवाना असल्याचे भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
------------------------------------