बसचालकांची मनमानी
By admin | Published: November 27, 2015 01:30 AM2015-11-27T01:30:33+5:302015-11-27T01:30:33+5:30
खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे
पिंपरी : खासगी वाहनांचे आव्हान पेलून प्रवासी संख्या जास्तीत जास्त वाढवण्याचे पीएमपीचे उद्दिष्ट आहे. मात्र, पीएमपी चालकांच्या मनमानी कारभारामुळे या धोरणाला हरताळ फासला जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात रात्री १०नंतर सुटणाऱ्या बस थांब्यावर थांबविण्याकडे टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणारे कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असून, पीएमपीच्या घोडदौडीला खीळ बसत असल्याची प्रचिती मंगळवारी आली.
निगडी-कात्रज ही ४२ नंबरची बस मंगळवारी रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी निगडीवरून निघाली. उद्योगनगरीतील अनेक कामगार या बसने प्रवास करतात. त्यामुळे रात्री ११ च्या सुमारास पिंपरीतील आंबेडकर चौकातील बसथांब्यावर १५ ते २० प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. या वेळी बस क्र. ४२-११ (आर २८२) निगडी येथून पिंपरी चौकात रात्री ११:१० वाजता आली. परंतु, पिंपरी चौकातील थांब्यावर प्रवाशांनी हात केल्यानंतरही बस न थांबविता मधल्या लेनमधून सुसाट नेली. त्यामुळे प्रवाशांना पुढील बस येईपर्यंत अर्धा तास ताटकळावे लागले. ही बस आकुर्डी थांब्यावरही थांबविली नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. निगडी-कात्रज बस उशिरा सुटली असल्याने संबंधित बसचालकाने बस थांबविली नसावी, असे गुळगुळीत उत्तर प्रशासनाने दिले.बसथांब्यावर चालकाने बस का थांबविली नाही, की वाहकाने त्याला थांबू दिली नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. त्या विषयीची तक्रार स्वारगेट केंद्रात दिली असून, अद्याप कोणतीही चौकशी व कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. चालक-वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवासी व नोकरदार वर्गाला बसत असून, पीएमपी प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)