खासगी रुग्णालयांची मनमानी सुरूच; कोविड रुग्णांकडून अवाच्या सवा बिलवसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:10 AM2021-05-27T04:10:01+5:302021-05-27T04:10:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली. या रुग्णवाढीचाच बहुतेक खासगी रुग्णालये गैरफायदा घेऊन रुग्णांची लूट करत आहेत. कोरोनाच्या काळात आतापर्यंत ३ हजार ४५७ कोरोना बिलांची तपासणी करून तब्बल १ कोटी ३४ लाख ४७ हजार रुपये कमी करण्यात आले.
गतवर्षी कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची लूट सुरू केली. अनेक रुग्णालयांकडून मनमानी पध्दतीने बिले आकारण्यात आली. यासाठी शासनाच्या आदेशानुसार बिलांची तपासणी करण्यासाठी लेखापरीक्षण समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बिलांच्या तपासणी करून रकमा कमी करण्यात आल्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या आणि खासगी कोविड रुग्णालयांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत दिवसाला तब्बल १० हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडले. ग्रामीण भागात देखील दिवसाला अडीच ते तीन हजार रुग्ण सापडत आहेत. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा आणि बेड्स मिळणे देखील कठीण झाले. या सर्व गैरसोईचाच फायदा घेत अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्णांची लूट सुरू केल्याचे लेखापरीक्षण समितीच्या तपासणीत स्पष्ट झाले.
------
जिल्ह्यात पाच रुग्णालयांवर कारवाई
कोरोना रुग्णांना मनमानी पध्दतीने बिल आकारणी करणाऱ्या व उपचारात हलगर्जी करणाऱ्या पाच रुग्णालयांवर जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी कारवाई केली. यात चाकणचे क्रिटिकेअर हाॅस्पिटल आणि दौंड तालुक्यात मोहन हाॅस्पिटल यांची कोविडची मान्यता रद्द करण्यात आली आहे. याशिवाय मावळ तालुक्यातील एक, शिक्रापूर येथील एक आणि सासवड येथील एका खासगी हाॅस्पिटलची चौकशी सुरू असून नोटिसा देण्यात आल्या आहेत.