सहकारनगरमध्ये महापालिकेचा मनमानी कारभार! खबरदारी न घेता काम करत महावितरणला आणले अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 11:06 AM2021-05-25T11:06:42+5:302021-05-25T11:06:47+5:30

रविवारी खोदकामाचा वीजयंत्रणेला दिला तडाखा, तर सोमवारी महावितरणच्या पोलवर पाडले झाड

Arbitrary management of Municipal Corporation in Sahakarnagar! Working without caution brought MSEDCL in trouble | सहकारनगरमध्ये महापालिकेचा मनमानी कारभार! खबरदारी न घेता काम करत महावितरणला आणले अडचणीत

सहकारनगरमध्ये महापालिकेचा मनमानी कारभार! खबरदारी न घेता काम करत महावितरणला आणले अडचणीत

Next
ठळक मुद्दे कोरोनाच्या संचारबंदीमुळे वर्क फ्रॉम होम, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत. मात्र या प्रकारांमुळे त्यांच्यासह इतर वीजग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावं लागला

पुणे: पुणे शहरातील सहकारनगर दोनमध्ये लागोपाठ दोन दिवस काम करताना महापालिका मनमानी कारभार करत आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्याने त्यांनी महावितरणला अडचणीत आणले आहे. रविवारी आणि सोमवारी घडलेल्या दोन घटनांमुळे दोन, तीन तास वीजपुरवठा खंडित झाला होता. तरीही दोन्ही वेळा महावितरणकडून तातडीने वीजपुरवठयाची व्यवस्था करण्यात आली. 

याबाबत माहिती अशी की, पर्वती विभाग अंतर्गत दत्तवाडी उपकेंद्रातून उच्चदाब वीजवाहिनीद्वारे सहकारनगर एक व दोन, तुळशीबागवाले कॉलनी, माडीवाले कॉलनी आदी परिसरातील सुमारे ११ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या भूमिगत वीजवाहिनीच्या लगतच पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरु आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत संबंधीत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता केलेल्या खोदकामात गणेश मंदिरजवळ ही भूमिगत वाहिनी तोडली. त्यामुळे सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली व तोडलेल्या वाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.

या घटनेनंतर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्वानंद चौकात जेसीबीने मोठे झाड तोडण्यात आले. मात्र योग्य खबरदारी न घेतल्याने हे झाड महावितरणच्या सहा पोल स्ट्रक्चरवर पडले. आणि ६ रोहित्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे सहकारनगर दोनमधील सुमारे १५०० ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित राहिला. खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान व ग्राहकांचा नाहक रोष महावितरणला सहन करावा लागला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच सध्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत. मात्र या प्रकारांमुळे त्यांच्यासह इतर वीजग्राहकांना देखील खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.

Web Title: Arbitrary management of Municipal Corporation in Sahakarnagar! Working without caution brought MSEDCL in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.