कात्रज उद्यानाजवळील पार्किंगचे दर मनमानी? पावतीवर दर नमूद नसल्याची धक्कादायक बाब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:35 PM2022-10-18T12:35:43+5:302022-10-18T12:35:59+5:30
पार्किंग चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्यामुळे वाहनचालक नाराज
संतोष गाजरे
कात्रज : पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. लोकसंख्या, बेशिस्त पार्किंग आणि महामार्गावरील अतिक्रमण यामुळे प्रवाशांना पार्किंगसाठी जागा मिळणे जिकिरीचे होत आहे. महानगरपालिकेकडून शहरात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे कात्रज उद्यानाजवळ पार्किंगची व्यवस्था आहे. तसेच समोरच पीएमटी डेपोजवळदेखील पार्किंगची व्यवस्था आहे, परंतु प्रवाशांकडून असे सांगण्यात येते की त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जात आहे. पार्किंग शुल्क भरल्यानंतर मिळालेल्या पावतीवर दर नमूद नसल्याची बाब समोर आली आहे. तर तेथे उपस्थित असलेल्या अटेंडंटद्वारे दर तोंडी कळवले जातात. दुचाकीकडून एका तासासाठी १० रुपये तर चारचाकीकडून चक्क १०० ते २०० रुपये आकारले जात आहेत.
कात्रज उद्यानामध्ये दररोज हजारो पर्यटक येत असतात. काही पर्यटक हे शहरातील असतात तर काही पर्यटक हे शहराबाहेरदेखील असतात, परंतु या पर्यटकांकडून पार्किंग चालकांकडून मनमानी दर आकारले जात असल्यामुळे वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कात्रज डेअरीजवळ पार्किंगच्या इथे कृष्णा कन्स्ट्रक्शन्स असा फलक लावण्यात आलेला आहे. येथे दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने उभी करता येतात, परंतु इथे कुठेही दरपत्रक आढळून येत नाही. वाहनांच्या मालकांना देण्यात आलेल्या पार्किंगच्या पावतीमध्ये पार्किंग शुल्काचा उल्लेख नाही. एका तासासाठी दुचाकीसाठी १० ते २० रुपये आकारले जात होते, तर चार चाकीसाठी १०० ते २०० रुपये दर आकारले जात होते. दुचाकीसाठी ताशी २ रुपये दर तर चारचाकी वाहनांसाठी १० रुपये दर प्रति तास असल्याची माहिती मिळाली. मी चार चाकी घेऊन पार्किंगसाठी साडेचारच्या दरम्यान गेलो असता माझ्याकडून शंभर रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. तसेच पावतीवर कोणतीही रक्कम नव्हती. मी अधिक माहिती विचारली असता दोन तासांचे २० रुपये द्या, अशी विनंती केल्याचे महेश किवडे यांनी सांगितले.
तक्रार करूनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
पार्किंगमधून पालिकेला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. ठेकेदाराने वाहनचालकाकडून तासाला किती शुल्क आकारायचे याबाबतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसारच ठेकेदारांनी वाहनचालकांकडून पैसे घेणे अपेक्षित आहे. मात्र शहरातील बहुतांश ठेकेदार मनमानी कारभार करत जादा पैसे घेत नागरिकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा पार्किंग चालक जादा दर घेत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तक्रार क्रमांक नमूद करून नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करू
सदरील ठिकाणी असे काही प्रकार होत असतील तर आम्ही त्याची चौकशी करू. बोर्ड आहे का नाही पाहून त्या ठिकाणी महापालिकेच्या दरपत्रकाचे बोर्ड लावण्यास सांगू तसेच तक्रार क्रमांक नमूद करून नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करू. - कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा
''कात्रज उद्यानात जाण्यासाठी वाहन पार्किंग केले असता जाताना पावती दिली व परत पावती घेऊन शंभर रुपये घेण्यात आल्याचे एका पर्यटकाने सांगितले.''