विमानतळ सेवेसाठी पीएमपीकडून मनमानी वसुली
By admin | Published: November 25, 2015 12:46 AM2015-11-25T00:46:40+5:302015-11-25T00:46:40+5:30
पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलीत बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकिट वसूली सुरू असल्याची
पुणे : पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातानुकुलीत बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकिट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बससेवेसाठी निविदा मागवून खासगी कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात असल्याचे कारण पुढे करीत पीएमपी प्रशासनाने या प्रकारणातून हात झटकले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी याबाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे केली असून ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. पीएमपी कडून या मार्गावर सध्या 10 बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
राज्यशासनाने 20 डिसेंबर 2005 मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार, सार्वजनिक वाहतूकीसाठी जास्तीत जास्त किती तिकिटदर आकारता येईल याचे निकष घालून दिले आहेत. त्यानुसार, 22 किलोमीटरसाठी 30 रूपये तर 32 किलोमीटरसाठी 42 रूपये दर निश्चित केलेला आहे. तर ही सुविधा वातानुकूलीत केल्यास त्यासाठी तिकिटावर 150 टक्के सरचार्ज आकारण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या नियमानुसार, पीएमपीएमएल कोथरूड ते विमानतळासाठी 75 रूपये आणि विमानतळ ते हिंजवडी या मार्गासाठी 105 रूपये दर आकारू शकते. पण प्रत्यक्षात कोथरूडसाठी 120 तर हिंजवडीसाठी 180 रूपयांचे तिकिट आकारले जात आहे. त्यामुळे ही तिकिट वसूली अन्यायकारक असून त्याबाबत पीएमपीने खुलासा करण़्याची मागणी केली असल्याचे परिसर संस्थेचे रणजीत गाडगीळ यांनी सांगितले. या बाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे दिली असून सोबत राज्यशासनाच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी आहे. पुणे विमानतळ हे देशातील दहाव्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ असून या ठिकाणी पीएमपी कडून केवळ डेक्कन वरून बस सुविधा होती. ती सुविधाही वेळेत नसल्याने प्रवाशांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. (प्रतिनिधी)