डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची खंडोबा मंदिराला भेट, खंडोबा मंदिर परिसराच्या विकासासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:15+5:302021-07-10T04:08:15+5:30
निमगाव येथील खंडोबा मंदिर महत्त्वाच्या १२ मल्हार मंदिरांपैकी सहावे स्थान असलेले येथील खंडोबा मंदिर एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असून तब्बल ...
निमगाव येथील खंडोबा मंदिर महत्त्वाच्या १२ मल्हार मंदिरांपैकी सहावे स्थान असलेले येथील खंडोबा मंदिर एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र असून तब्बल चारशे वर्षांचा पुरातन वारसा मंदिराच्या रूपाने आपली वेगळी ओळख टिकवून आहे. डोंगरावर असणाऱ्या या मंदिराला प्रचंड मोठी तटबंदी असून पूर्वेकडे भव्य प्रवेशद्वार असून येथील दरवाजा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे. मंदिर परिसर आणि तटबंदीचा जीर्णोद्धार करून इथे शास्त्रीय आणि आधुनिक पद्धतीने डागडुजी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागप्रमुख डॉ. पांडुरंग साबळे यांनी सांगितले. खंडोबा मंदिर परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने येथील पर्यावरण, देशी वनस्पतींचे वृक्षारोपण, स्थानिक शेती, भीमा नदीकाठ, पर्यटन विकास आणि एकंदरच पूर्ण तीर्थक्षेत्राचा विकास शास्त्रीय मार्गाने करण्यावर भर देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव संकेत भोंडवे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने हे काम केले जाणार आहे. मंदिराच्या बांधकामातील बारकावे अभ्यासून मुख्य प्रवेशद्वार, दीपमाळ, मंदिराच्या आतील भागाची डागडुजी आणि लेपन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार असल्याचे इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक दीपक वाटेकर यांनी सांगितले. येथील मंदिराची सुंदर बांधणी आणि वास्तुकला सतराव्या शतकातील असून अर्किटेक्चरचा एक अनोखा नमुना असल्याचे कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट अविनाश भिसे यांनी सांगितले. मंदिराच्या ज्या भागातील पडझड झाली आहे त्याच्या पुनर्बांधणीसाठी पूर्वी वापरलेल्या चुना, गूळ, वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती इत्यादीचा पुन्हा वापर करून मंदिराला पूर्वीचे वैभव पुनर्स्थापन केले जाणार आहे. छतावरील नाजूक कलाकुसर, दीपमाळेवरील कोरीव काम आधुनिक रडार तंत्रज्ञाचा वापर करून त्याचा त्रिमितीय आराखडा तज्ज्ञांच्या मदतीने तयार केला जाणार आहे. मंदिराच्या पाठीमागे वन विभागाच्या २४ एकर जमिनीवर देवराईच्या संकल्पनेवर आधारित वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यात हिरडा, बेहडा, कडुलिंब, सातवीण, आपटा, वड, पिंपळ, उंबर, चिंच, आपटा आदी महत्त्वपूर्ण देशी वृक्षांबरोबरच पक्ष्यांसाठी बकूळ, कदंब, रोहितक, टेम्भूर्णी सारखे वृक्ष लावले गेले असून स्थानिक पर्यावरण संवर्धनात समतोल राखण्यासाठी याचा खूप उपयोग होईल, असे प्रतिपादन वनस्पतीतज्ज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी केले. विभागीय वनाधिकारी जयराम गौडा यांनी सांगितले की, उन्हाळ्यात या वृक्षांना पाणी कमी पडू नये म्हणून पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या इथे ठेवण्यात आल्या असून इथे रस्त्याच्या कडेला बांबू आणि बहाव्याची रोपं लावली असून येथील परिसर हिरवागार करण्यासाठी तब्बल ८० प्रकारच्या ५५५५ वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यात अनेक औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. यावेळी निमगावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अमर शिंदे राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष बबन शिंदे, संतोष शिंदे, अमोल भोंडवे तसेच जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळ व निमगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार यासाठी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी खंडोबा मंदिराला भेट दिली.