पुरातत्त्वशास्त्र : वारसा, अध्ययन आणि करिअरच्या संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:55+5:302021-04-01T04:09:55+5:30
शालेय अभ्यासक्रमात अंतर्गत अश्मयुगीन मानव आणि हडप्पा संस्कृतीच्या अध्ययनातून पुरातत्त्वशास्त्राची ओळख शालेय विद्यार्थ्यांना होत असते. ज्यातून पुरातत्त्वशास्त्राची शास्त्रीय माहिती ...
शालेय अभ्यासक्रमात अंतर्गत अश्मयुगीन मानव आणि हडप्पा संस्कृतीच्या अध्ययनातून पुरातत्त्वशास्त्राची ओळख शालेय विद्यार्थ्यांना होत असते. ज्यातून पुरातत्त्वशास्त्राची शास्त्रीय माहिती जाणून घेण्याचे औस्तुक्य निर्माण होते. साधारणत: मागील पंधरा वर्षांपासून पुरातत्त्वशास्त्र आणि वारसा अध्ययनात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणा-या तरुण विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतून या विषयाकडे आकर्षित होण्यामागची ही पार्श्वभूमी आहे.
प्रामुख्याने कला शाखेत पदवीधर असणा-या विद्यार्थ्यांना पुरातत्त्वशास्त्रात पदव्युत्तर (मास्टर आॅफ आर्ट्स) अभ्यासक्रमासाठी प्राधान्य दिले जात असले तरी पुणे येथील डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) मध्ये पुरातत्त्वशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर पात्र आहे. महाराष्ट्रात प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयात डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या शैक्षणिक संस्थात पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएचडी संशोधनाच्या संधी उपलब्ध आहे. भारतातील प्रमुख शैक्षणिक संस्था ज्यात पुरातत्त्वशास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात त्यात महाराजा सयाजी विद्यापीठ, वडोदरा, केरळ विद्यापीठ, तिरुअनंतपूरम, बनारस हिंदू विद्यापीठ, वारणसी, अलाहाबाद विद्यापीठ, प्रयागराज, मद्रास विद्यापीठ, चेन्नई, आंध्र विद्यापीठ, विशाखापट्टणम आदींचा समावेश होतो.
पुरातत्त्वशास्त्राशी निगडित सागरी पुरातत्त्व विषयात पदविका अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक वारसा जतन आणि व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पुणे येथील डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठात) शिकविले जातात. पुरातत्त्वशास्त्र आणि प्राचीन भारतीय संस्कृती यांची सांगड घालून प्राचीन भारताच्या अध्ययनाशी निगडित भारतविद्या (इंडॉलॉजी) या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शिकविला जातो. भारतविद्या या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा या विद्यापीठात शिकविला जातो. ज्यात तरुण वर्गासोबतच वरिष्ठ नागरिकांनी विशेष सहभाग नोंदविला आहे.
वारसा जतन व संवर्धन क्षेत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम राष्ट्रीय संग्रहालय, नवीन दिल्ली येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेत शिकविला जातो. पुरातत्त्वशास्त्रातील प्रात्यक्षिक शिक्षणावर आधारित पदव्युतर पदविका अभ्यासक्रम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारा संचलित उत्तर प्रदेशातील नोयडा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पुरातत्व संस्थेत शिकविला जातो. वारसा क्षेत्रातील आकर्षण आणि पर्यटन उद्योगाचे वाढते स्वरूप बघता काळाजी गरज म्हणून वारसा अध्ययन आणि पर्यटन यांची सांगड घालून पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभागाने आगामी शैक्षणिक वर्षापासून बौद्ध वारसा व पर्यटन पदव्युत्तर पदविका हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) यांच्या सहकार्याने सुरू केलेला आहे.
पुरातत्त्वशास्त्र आणि वारसा अध्ययन या विषयात पदविका/पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विषयाशी निगडित क्षेत्रात पुढे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत का हा प्रश्न विद्यार्थी व पालक वर्गाकडून साहजिकच विचारला जातो.
पुरातत्त्वशास्त्र व वारसा अध्ययन या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर (पीएच.डी/पोस्ट डॉक्टरल) संशोधनासाठीच्या देशातील प्रमुख विद्यापीठात संधी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अध्यापनात विशेष आवड आहे ते विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारा आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) ही परीक्षा पुरातत्त्व विषयात उत्तीर्ण करून महाविद्यालये/विद्यापीठ यात सहायक प्राध्यापक म्हणून कार्य करू शकतात.
डॉक्टरल संशोधनासाठी (पीएचडी) विद्यापीठ अनुदान आयोग आणि भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (आयसीएचआर) द्वारा छात्रवृत्ती (फेलोशिप) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्राप्त होऊ शकतात.
डेक्कन कॉलेजसारख्या पुरातत्त्वशास्त्रातील अग्रणी संशोधन संस्थेने वेळोवेळी हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पात संशोधन सहाय्यक (रिसर्च असिस्टंट) म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अलीकडील काळात या संस्थेत सुरू झालेल्या केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारा अनुदानित राखीगढी प्रकल्पाचा या संदर्भात उल्लेख करावा लागेल.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, विविध राज्य सरकारची पुरातत्त्व आणि वस्तु संग्रहालये विभागे, देशातील प्रमुख वस्तुसंग्रहालये- राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, नवी दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई, इंडियन म्युझियम, कोलकता आदी शासकीय-निमशासकीय संस्थात पुरातत्व शास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त झाल्यावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय पुरातत्त्व वारसा व पर्यटन यांची सांगड घालून वारसा पर्यटन (हेरिटेज टुरिझम) या क्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण करता येऊ शकतात, ज्यात हेरिटेज वॉक, वारसास्थळांवर अभ्यास भेट, कार्यशाळा यांचे आयोजन करत येऊ शकते.
आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी प्राप्त करणे अवघड असले तरी पुरातत्त्व आणि वारसा अध्ययन क्षेत्रात ज्यांना विशेष रुची आहे, त्यांना भविष्यात निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यासाठी आवश्यकता आहे कष्ट करण्याची आणि संयमाची!
डॉ. श्रीकांत गणवीर, सहायक प्राध्यापक, पुरातत्त्व विभाग, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे