वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना नगररचनेत ‘नो एंट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:36 AM2017-09-02T01:36:40+5:302017-09-02T01:36:50+5:30
वास्तुकला व नियोजन अभ्यासक्रमाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांपासून नगररचना अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये (एमटेक - टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग) प्रवेशासाठी ‘नो एंट्री’ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे
पुणे : वास्तुकला व नियोजन अभ्यासक्रमाची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मागील वर्षांपासून नगररचना अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीमध्ये (एमटेक - टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग) प्रवेशासाठी ‘नो एंट्री’ असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांना आधी पात्रतेत डावलल्यानंतर त्यांचा प्रवेशाचा कोटाही काढून घेण्यात आला. त्यामुळे शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात वास्तुकला व नियोजनच्या केवळ प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे. याविषयी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात केवळ सीओईपीमध्ये ‘एमटेक-टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग’ हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता केवळ ३१ आहे. त्यामुळे दर वर्षी प्रवेशासाठी चढाओढ असते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी वास्तुकलेची पदवी घेतलेले विद्यार्थी पात्र होते. तसेच, प्रवेश देताना वास्तुकला, स्थापत्य आणि नियोजन या तीन पदवी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे ११, १० व १० असा प्रवेशासाठी कोटा महाविद्यालयाने निश्चित केला होता. त्यामुळे तिन्ही अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळत होती; पण मागील वर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाच्या पात्रतेत बदल करून वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरविले. तसेच, कोटा पद्धत बंद करून एकत्रित गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देण्यास सुरुवात केली.
पात्रतेबाबत वास्तुकलेच्या एका विद्यार्थिनीने मागील वर्षी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तिची बाजू ग्राह्य धरून पात्रता कायम ठेवली. मात्र, तरीही यंदा वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अपात्र ठरवून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. मग, यंदाही सहा विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. तसेच, न्यायालयाने कोटा पद्धतीनुसार प्रवेश द्यावेत, असे आदेशात म्हटल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, तरीही डीटीईकडून एकत्रित गुणवत्ता यादीच्या आधारे प्रवेश देण्यात आले. यामध्ये स्थापत्यच्या २७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, वास्तुकला व नियोजनच्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला केवळ ४ जागा आल्या आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याविषयी तंत्रशिक्षण संचालनालयाचे पुणे विभागाचे सहायक संचालक राजेंद्र गायकवाड म्हणाले, ‘‘मागील वर्षी प्रवेशाच्या निकषात बदल करण्यात आले आहेत. तसेच, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.’’