घर चालवणारी अर्धांगिनी आता पतीसोबत गावगाड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:30+5:302021-01-19T04:14:30+5:30
खोडद : घराला तसा राजकीय वारसा म्हणावा तर जेमतेम दहाच वर्षांचा. पतीचा राजकारणात ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच असा राजकीय ...
खोडद : घराला तसा राजकीय वारसा म्हणावा तर जेमतेम दहाच वर्षांचा. पतीचा राजकारणात ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच असा राजकीय प्रवास अगदी डोळ्यांसमोर पाहायला आणि अनुभवायला मिळाला तो लग्न झाल्यापासूनच.पतीला असणारी राजकारण व समाजकारणाची आवड...घरीदारी संसारातही केवळ राजकारणाच्या गप्पा सतत ऐकायला मिळणारी 'ती'....आज आपल्या पतीराजांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणातील अर्धांगिनी बनली आहे.संसाराबरोबरच गावगाडा चालविण्यास मी देखील पतीराजांना सोबत करणार असे ठाम सांगू लागली आहे जुन्नर तालुक्यातील धनगरवाडीची प्रियंका शेळके...! जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आहे.या निवडणुकीत प्रभाग क्र.३ मधून एका जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली तर दोन जागांसाठी लढत झाली.विशेष म्हणजे, या प्रभागातून महेश जयवंत शेळके व प्रियंका महेश शेळके हे पतिपत्नी विजयी झाले आहेत.एकाच प्रभागातून पतिपत्नी निवडणूक लढवून विजयी होणारं हे पुणे जिल्ह्यातील हे एकमेव उदाहरण आहे.महेश शेळके यांचं शिक्षण बीएस्सी केमिस्ट्री झालं असून विधेयक कामात त्यांचं नेहमीच योगदान आहे. महेश शेळके हे मागील दहा वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत, तर २०१० मध्ये त्यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिले होते.
महेश शेळके आणि प्रियंका शेळके यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रियंका यांचं इंजिनिअरिंग झालं असून त्या गृहिणी आहेत.एकाच प्रभागातून निवडणूक लढवत असताना एकाच घरातील दोघांना जनता स्वीकारेल की नाही किंवा पतीच्या लोकप्रियतेमुळे निवडणूक सहज आणि सोपी होईल अशा चर्चेला ऊत आलेला असतानाच मात्र दोघांनीही बाजी मारली आहे.महेश शेळके यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कोरोना काळात आजवर अनेक गोरगरिबांना मदत केली आहे.शैक्षणिक, क्रीडा,पर्यावरण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात महेश शेळके यांचे कार्य उल्लेखनीय आहे.सध्या या नवरा बायकोच्या विजयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
धनगरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र.१: राजेंद्र विठ्ठल शेळके (११९),योगिता अमोल शेळके (१६८),नयना उमेश कराळे(बिनविरोध) प्रभाग क्र.२ सोनल सचिन पवार (१३२),निर्मला दिलीप घोगरे (१२२),इंद्रजित अरुण शेळके (१११), प्रभाग क्र.३ महेश जयवंत शेळके (२४५),प्रियंका महेश शेळके (२४३),राणी विश्वास जाधव (बिनविरोध)
जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच प्रभागातून विजयी झालेले पतिपत्नी महेश शेळके व प्रियंका शेळके.