वाढदिवसानंतर ३६४ दिवस आपण मृतप्राय असतो का? आशुतोष राणा यांचा सवाल
By श्रीकिशन काळे | Published: September 16, 2023 04:06 PM2023-09-16T16:06:47+5:302023-09-16T16:07:02+5:30
सणच नव्हे तर भावनाही साजऱ्या होतात...
पुणे : ‘‘ हिंदी ही माझ्या स्वप्नांची भाषा आहे. माझ्या प्रियजनांची भाषा आहे. पण लोक मला विचारतात की, हिंदी पंधरवडा का साजरा केला जातो, फक्त १५ दिवसच हिंदीची सेवा का? तेव्हा त्यांना माझे सरळ उत्तर आहे की, हा विनोदाचा विषय नाही. ही आपली उत्सव साजरा करण्याची भावना आहे. आपण वर्षातून एकदा आपला वाढदिवस साजरा करतो याचा अर्थ आपण ३६४ दिवस मृतप्राय आहोत असा होत नाही,’’ असे परखड मत अभिनेते आशुतोष राणा यांनी व्यक्त केले.
बालेवाडे म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात राणा बोलत होते. ज्येष्ठ कवी, गीतकार आणि टीव्ही पत्रकार आलोक श्रीवास्तव यांनी त्यांची मुलाखत घेतली.
आशुतोष राणा म्हणाले की, मी एक अभिनेता म्हणून तुम्हाला आवडेन किंवा आवडणार नाही, पण एक भाषाप्रेमी असल्याने तुम्हाला मी नक्कीच आवडेल. भाषा आपल्यातील भावना जागृत करते. लिहिण्या बोलण्यात वापर करून हिंदी भाषेचा आम्ही सन्मान केला असे अनेकजण म्हणतात, पण मी म्हणेन हिंदीने मला सन्मान दिला आहे. आशुतोष राणाची ओळख तुमच्यामध्ये अभिनेता म्हणून असेल पण मला वाटते की माझी ओळख एक लेखक आहे. हिंदी ही माझ्या स्वप्नांची भाषा आहे, माझ्या रोजगाराची भाषा आहे, त्यामुळे ती समृद्ध झालीच पाहिजे. हा आपल्या व्यवसायाचा आणि वर्तन स्वभावाचाही विषय आहे. माझ्या आईला अनेक भाषा अवगत होत्या. आम्ही लहान असताना ती म्हणत असे की तुम्ही भाषेचा सन्मान राखलात तर ती तुमचा मान राखेल.’’
सणच नव्हे तर भावनाही साजऱ्या होतात
हिंदी दिवस आणि हिंदी पंधरवडा साजरा करण्यामागील कारण म्हणजे या दिवशी आणि या पंधरवड्यात आपण हिंदीच्या सेवेचा उत्सव साजरा करतो. आपल्या देशात केवळ सणच साजरे होत नाहीत, भावनाही साजऱ्या होतात, भाषाही साजऱ्या होतात. भारतीयांच्या स्वभावाचा मूळ कल उत्सवाकडे आहे, असे सांगत आशुतोष राणा यांनी अनेक रंजक प्रसंग कथन केले आणि कविताही सादर केल्या.