महामानवांच्या विचारांवर आपण चालत आहोत का? - विद्या बाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 02:00 AM2019-02-08T02:00:09+5:302019-02-08T02:00:23+5:30
हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.
पुणे - हल्लीच्या काळात उत्सवांचे उदात्तीकरण आणि धांगडधिंगात रूपांतर झाले आहे, ते अत्यंत दु:खदायक आहे. ज्या लोकांच्या नावाने उत्सव साजरे करतो त्यांच्या फोटो, पुतळ्यासमोर ज्या बीभत्स पद्धतीने नाचतो हे योग्य आहे का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे. महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२२व्या जयंतीनिमित्त ‘जागर रमार्इंच्या विचारांचा देशाच्या हिताचा’ या अभियनाअंतर्गत रमाई महोत्सवात विद्या बाळ यांना महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे ज्येष्ठ कवयित्री प्रतिभाताई शाहू-मोडक यांच्या हस्ते ‘रमाईरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. राज्याचे कारागृह व सुधारसेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अभय छाजेड, कुणाल राजगुरू, सुजाता शेट्टी, लता राजगुरू, अॅड. जयदेव गायकवाड, दादा सोनवणे उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोठे होतेच. त्यांचे जगभर विचारवंत म्हणून नाव होते. परंतु हे होत असताना ज्या रमाईने प्रचंड कष्ट उपसले, बाबासाहेबांच्या खडतर प्रवासात त्यांना साथ दिली त्या महामाता रमामार्इंचे योगदान मात्र दुर्लक्षित राहिले असल्याची खंतही बाळ यांनी व्यक्त केली. अॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले.
बाळ म्हणाल्या, बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचा विचार मांडला पंरतु आजदेखील ती जात नष्ट झालेली नाही. जातींचे निर्मूलन ही काळाची गरज आहे. ज्यांनी समतेचा विचार मांडला, रुजवला आणि समतेचा विचार आचारणात आणला अशा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ सावित्री-ज्योतिबा समता उत्सव साजरा करतो. मात्र त्या महामानवांनी आपणांस जो संदेश, विचार दिला आहे, त्या विचारपथावर आपण चालत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने विचारणे गरजेचे आहे.