चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार सुरक्षित आहेत का? फायर ऑडिट होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:52+5:302021-06-10T04:08:52+5:30

चाकण : ‘ऑटोमोबाइल हब’ म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये हजारोंच्या संख्येने लहान-मोठे कारखाने अहोरात्र कार्यरत आहेत. या कारखान्यांत ...

Are workers safe in Chakan Industrial Estate? Fire audits are required | चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार सुरक्षित आहेत का? फायर ऑडिट होणे गरजेचे

चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार सुरक्षित आहेत का? फायर ऑडिट होणे गरजेचे

Next

चाकण : ‘ऑटोमोबाइल हब’ म्हणून नावारूपाला आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये हजारोंच्या संख्येने लहान-मोठे कारखाने अहोरात्र कार्यरत आहेत. या कारखान्यांत काम करणारे कामगार नक्की सुरक्षित आहेत का, हा प्रश्न नुकत्याच पिरंगुट येथे घडलेल्या आगीच्या घटनेवरून समोर आला आहे. कारण चाकण औद्योगिक वसाहतीमध्येही अनेकदा आगीच्या जीवघेण्या घटना घडल्या आहेत.

वाहन उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून चाकण एमआयडीसीने जगात नावलौकिक मिळविला आहे. परंतु विकास करताना नागरिकांच्या मूलभूत गरजा व सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी अनेक खासगी गोदामे उभी राहिली आहेत. या गोदामांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिसून येत नाही. अशी अनेक गोदामे निवासी भागांमध्ये उभी करून या गोदामातून असंख्य छोटे-मोठे उद्योगधंदे केले जात आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षिततेची कोणतीही काळजी न घेता काम करून घेतले जात असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.

चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यात व गोदामात तसेच मोठ्या सोसायट्यांच्या इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आल्याच नाहीत. आग लागल्यावर लोकांना त्वरित बाहेर पडता येत नाही. यासाठी औद्योगिक वसाहतीतील कारखाने व गोदामांचे फायर ऑडिट करणे, प्रत्येक इमारतींना अग्निप्रतिबंधक उपाययोजना सक्तीचे करणे गरजेचे आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर गोदामातून किंवा इमारतीतून लोकांना त्वरित बाहेर पडण्यासाठी पुरेशी आपत्कालीन मार्गाची व्यवस्था नाही. यासाठी संबंधित विभागाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला हवे. गोदामात किंवा कारखान्यात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांसंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांनी अशा घटनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

* चाकण परिसरातील अनेक गोदामे रहिवासी भागात असल्याने आग लागल्यावर अग्निशामक दलाच्या गाड्या जाणे ही अडचणीचे होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करूनही जीवित व वित्तहानी टाळणे अवघड होऊन बसते. याकरिता गोदाम भाड्याने घेताना ते कोणत्या झोनमध्ये आहे. कायदेशीर परवानगी घेवून बांधकाम केले आहे का, या गोदामात कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत का, याची काळजी घेऊनच उद्योजकांनी गोदामे भाडेतत्त्वावर घेणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षांमध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक लहान-मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये खराबवाडी येथील बेकायदेशीर गोदामाला भीषण आग लागून पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर भांबोली येथील एका कंपनीच्या कंपाऊंड बांधकाम कोसळून त्यात कामगारांचा मृत्यू झाला होता. या ठळक जीवघेण्या घटनांसह आर्थिक नुकसानीच्या आगीच्या घटना नेहमीच घडतात.

Web Title: Are workers safe in Chakan Industrial Estate? Fire audits are required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.