मतभेद मिटवून एकत्र येणार आहात की नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:50+5:302021-09-18T04:12:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे- पक्षाने तुम्हाला बरेच काही दिले, आता तुम्ही पक्षाला काही द्यायची वेळ आली आहे. तुमच्यातील मतभेद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे- पक्षाने तुम्हाला बरेच काही दिले, आता तुम्ही पक्षाला काही द्यायची वेळ आली आहे. तुमच्यातील मतभेद मिटवून एकत्र येणार आहात की नाही, असे उद्वेगजनक उद्गार काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पक्षाच्या ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी काढले.
काही दिवसांंपूर्वी पक्षाच्याच एका ज्येष्ठ नगरसेवकाने एका ज्येष्ठ नेत्याच्या पक्षनिष्ठेविषयी शंका व्यक्त करणारे पत्र शहराध्यक्षांना दिले. त्यानंतर आज (शुक्रवारी) बैठकीच्याच वेळी कोणीतरी नेत्याने पक्षाचे ज्येष्ठ नेते याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रवेश कार्यक्रमाच्या वेळचा भला मोठा फ्लेक्स काँग्रेस भवनच्याच दारात लावला. त्याशिवाय सातत्याने पक्षातल्या पक्षातच आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा सातत्याने उडतो आहे.
या सगळ्या प्रकारांनी त्रस्त झालेल्या बागवे यांचा वैताग ब्लॉक अध्यक्षांच्या बैठकीत व्यक्त झाला. पक्षाची अवस्था काय झाली आहे, याचा काहीतरी विचार करा, मतभेद मिटवा, फुटीरपणा सोडून एकसंध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. वरून कोणीही नेता तुम्हाला समजावयाला येणार नाही. तुम्ही वाटही पाहू नका, आपापला परिसर पिंजून काढा, पक्षाचा व्यापक आधार असलेल्या पारंपरिक मतपेढीत जाऊन त्यांना जवळ करा, असे केले तरच पक्षाचा पाया पुन्हा पक्का होईल, असे त्यांनी सांगितले.
सातत्याने होत असलेल्या मतभेदांविषयी बागवे यांना बैठकीनंतर विचारले असता, त्यांनी मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आहे, त्यांची दखल घेऊन त्यांना मोठे करण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी अदखलपात्र आहेत, असे बागवे म्हणाले.
दरम्यान, शहरातील प्रत्येक प्रभागासाठी पक्षाच्या या बैठकीत ब्लॉक अध्यक्षांना कार्यक्रम देण्यात आला. कार्यकर्त्यांसमवेत प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन मतदारांबरोबर संपर्क प्रस्थापित करावा, असे त्यांना सांगण्यात आले. याचा अहवाल तयार करून तो पक्ष कार्यालयात सादर करायचा आहे.