चंद्रावर आहात की शिवण्यात ? रस्त्याचे अर्धवट सिमेंटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:47 AM2018-08-30T01:47:04+5:302018-08-30T01:47:57+5:30
खड्ड्यात हरवला रस्ता : दररोजच्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त
पुणे : जिकडे नजर जाईल, तिकडे दृष्टीस पडणारा जमिनीचा खडबडीत पृष्ठभाग... पावलोपावली लहान-मोठे खड्डे... जमिनीवर सलग चालणे शक्य नसल्याने पडण्याच्या भीतीने श्वास रोखून प्रवास करणारे नागरिक... असे चित्र पाहिले, की हे चंद्रावरचे वर्णन आहे की काय? अशी शंका येईल. मात्र, हे चित्र आहे शिवणे-उत्तमनगर परिसरातले. याबाबत प्रशासनामध्ये कमालीची उदासीनता दिसत असून, नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘शासनाचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा उद्विग्न सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. महापालिकेत समावेश होत असल्याने ग्रामपंचायत नाही व महापालिकाही काम करायला तयार नाही, अशी शिवणे-उत्तमनगर या गावांची स्थिती झाली आहे. शासकीय विभागाच्या टोलवाटोलवीमध्ये वाहनचालक मात्र भरडले जात आहेत.
महापालिकेच्या समाविष्ट गावांमध्ये शिवणे, उत्तमनगर परिसराचा समावेश करण्यात आला आहे. शिवणे परिसरामध्ये प्रवेश केल्यापासून रस्त्यांची दुरवस्था नागरिकांचे स्वागत करताना दिसते. शिंदे पुलापासून कोंढवे धावडेपर्यंत जागोजागी रस्ता खड्ड्यात हरवलेला पाहायला मिळतो. खड्ड्यांमधून वाट काढण्याची कसरत करताना वाहनचालकांना १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी किमान अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. दिवसातल्या कोणत्याही वेळी या परिसरात वाहतूककोंडीच निदर्शनास पडते.
शिवणे-उत्तमनगर, कोंढवे धावडे या परिसरात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. तसेच, नवनवीन इमारती, वसाहती उभ्या राहत असल्याने लोकसंख्याही लक्षणीयरीत्या वाढत आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. परंतु, सध्या या मुख्य रस्त्यावर गुडघाभर खोल खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या मार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या दीड ते दोन फुटांनी खचल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत असून, वाहनचालकांना कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना पाठीच्या, मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघातही नित्याचे झाले आहेत.
महापालिकेच्या पथ विभागातर्फे या रस्त्यांसाठी १ कोटींची तरतूद, तर रस्तेदुरुस्ती आणि विकासासाठी ७३ लाखांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर काही रस्ते निश्चित करण्यात आले आहेत. महापालिकेच्या पद्धतीने ते रस्ते तयार करण्यात येणार असल्याची केवळ आश्वासनेच दिली जात आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार? हा प्रश्न मात्र सुटायला तयार नाही. या परिसरात घर घेतल्याचा पश्चात्ताप होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
एनडीए रस्त्याच्या काही भागाचे सिमेंटीकरण करून, काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे कुठे खोल खड्डे, तर कुठे उंचवटा, अशी स्थिती पहायला मिळते. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पावसाळ्यामुळे सध्या काम थांबविण्यात आले आहे.
तीन किलोमीटर रस्त्याचे काम मंजूर झाले असून, त्यापैकी दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, तर एक किलोमीटरचे बाकी आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत ते पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिवणे, उत्तमनगर परिसरातील एनडीए रस्त्यासाठी १ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी महापालिकेच्या अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या टेंडरची प्रक्रिया सुरू असून, पुढील महिनाभरात कामाची आॅर्डर निघेल. त्यानंतर तातडीने कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख