आपण खरंच स्वतंत्र आहोत का ? प्रतिभा राय यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:49 AM2018-05-27T03:49:11+5:302018-05-27T03:49:11+5:30

आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे.

 Are you really free? The question of Pratibha Roy | आपण खरंच स्वतंत्र आहोत का ? प्रतिभा राय यांचा सवाल

आपण खरंच स्वतंत्र आहोत का ? प्रतिभा राय यांचा सवाल

Next

पुणे - आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे. त्यासाठी भीती बाळगण्याची गरज नाही. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी गर्जना करीत समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली होती. त्यामुळे लेखकांवर कुणीही बंधनं घालू शकत नाही, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध उडिया लेखिका डॉ. प्रतिभा राय यांनी देशातील असहिष्णुतेवर टीका केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११२व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, चंद्रकांत शेवाळे, परिषदेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.
सुरुवातीलाच ‘‘महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करीत आहे, या मातीत जन्माला आलेल्या शूरवीर, ज्ञानी, गुणीजन व्यक्तींना सादर प्रणाम करते. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे,’’ अशा मराठी बोलातून प्रतिभा राय यांनी पुणेकरांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, ‘‘लेखकाच्या लेखणीमध्ये देवाला आव्हान देण्याबरोबरच हे काय चालले आहे? असा जाब विचारून शत्रुत्व स्वीकारण्याइतकी ताकद आहे. भयमुक्त भारत होणार नाही तोपर्यंत ही पृथ्वी भयमुक्त होणार नाही. देशात धर्म, जात, असमानता यातून उद्भवणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर लेखकांनी प्रहार करायला हवा.’’
या वेळी ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, मकुंद दातार, प्रतिभा रानडे या पारितोषिक विजेत्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

राज्यघटना तिजोरीत बंद
४रावसाहेब कसबे म्हणाले, भारतात सध्या भयमुक्त वातावरण आहे, असे म्हणता येणार नाही. लोक म्हणतात, राज्यघटना सुरक्षित आहे पण वस्तुस्थिती पाहिली तर घटना देशाच्या तिजोरीत बंद करून ठेवल्याचे चित्र आहे. हिंदू आणि मुस्लिम वाद या विषयापुढे तरुणांचा रोजगार, ज्येष्ठांना मिळणारी पेन्शन, स्त्रियांचे हक्क असे विषय तुरळक होत चालले आहेत. गायीभोवती देशाचे राजकारण फिरत आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशा वेळेला साहित्यिकाने केवळ साहित्यविश्वात रमून उपयोग नाही. जगातल्या सगळ्या क्रांतींचा पाया साहित्यिकांनी रचला आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
४मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, याकडे प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविकात लक्ष वेधले. येत्या कालखंडात अभिजात भाषेचा दर्जा जाहीर केला नाही तर मराठी जनता पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करेल.
 

Web Title:  Are you really free? The question of Pratibha Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.