बारामतीमध्ये रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले
By admin | Published: November 8, 2016 01:11 AM2016-11-08T01:11:18+5:302016-11-08T01:11:18+5:30
परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते
बारामती : परतीच्या पावसाने तालुक्याला चांगला आधार दिल्याने यंदा मागील वर्षीपेक्षा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे जिरायती भागातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. याही वर्षी जिरायती भागातील काही गावांमध्ये पावसाने तोंड दाखवले नाही. जलयुक्त शिवार म्धून झालेल्या कामांमुळे काही ठिकाणी पाण्याचे साठे झाले आहेत. त्या पाण्याच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली आहे.
बारामती तालुका रब्बी तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बीमध्ये प्रामुख्याने ज्वारी पीक घेतले जाते. त्याखालोखाल मका, गहू, हरभरा व चारापिकांच्या लागवडी शेतकरी करीत असतो. बारामती तालुक्याच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा विचार केला असता नीरा डावा कालव्यामुळे परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात प्रामुख्याने ऊस व फळबागांखालील क्षेत्र जास्त आहे. तर तालुक्याच्या जिरायती पट्ट्यांमध्ये तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतले जाते. मागील चार ते पाच वर्षांपासून जिरायती पट्टा दुष्काळाने होरपळत आहे. कोणतेच पीक हाती न लागल्याने येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. जिरायती पट्ट्यात दूध व्यवसाय मोठ्याप्रमाणावर केला जातो. मात्र, चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय देखील आर्थिक संकटात सापडला होता. येथील दुग्धोउत्पादकांना ३ हजार ५०० रुपये टनाने चारा विकत घेण्याची वेळ आली होती. दुग्धव्यवसायामुळे येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात तृणधान्य, कडधान्यांचे पीक घेतात. या पिकांच्या उत्पादनानंतर त्याचा जनावरांना चारा म्हणूनदेखील वापर करता येतो.
यंदा ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र पेरणी क्षेत्र अद्यापही सरासरीपर्यंत पोहोचले नाही. यंदा तालुक्यात ज्वारीच्या ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याखालोखाल मक्याची १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका पिकाने सरासरी ओलांडली असून, चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड होत असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यास १ महिना विलंब झाला आहे. त्यामुळे गहू पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिसरात ऊस तोडणीनंतरच त्या क्षेत्रात शेतकरी गव्हाची पेरणी करीत असतो. सध्या ऊसतोडी सुरू आहेत. मोकळ्या झालेल्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यात केवळ ४ टक्के क्षेत्रावरच गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत, असे कृषी विभागाने सांगितले.