गाळे सार्वजनिक बांधकामच्या जागेतच?
By admin | Published: December 22, 2015 01:35 AM2015-12-22T01:35:37+5:302015-12-22T01:35:37+5:30
नारायणगावमधील ‘त्या’ बहुचर्चित गाळ््यांची अखेर सोमवारी पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या जागेची बांधकाम विभागाची हद्द निश्चित करण्यात आली आहे
नारायणगाव : नारायणगावमधील ‘त्या’ बहुचर्चित गाळ््यांची अखेर सोमवारी पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्यात आली. नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या जागेची बांधकाम विभागाची हद्द निश्चित करण्यात आली आहे. नकाशा ८ ते १० दिवसांत भूमिअभिलेख विभागाकडून प्राप्त होणार आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता गणेश पोहेकर यांनी सांगितले असून मोजणीमध्ये सर्वच्या सर्व ६१ गाळे हे अतिक्रमणात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
नारायणगाव बस स्थानकालगतचे गाळे अतिक्रमणात आहेत किंवा नाही व सार्वजनिक बांधकाम विभागाला आपली हद्द कायम करण्यासाठी ही मोजणी करण्यात आली़ मोजणीला
विरोध होण्याची शक्यता असल्याने काय होणार, यासाठी सर्वांना उत्कंठा लागली होती़
नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी ३० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी ठेवला होता़ सकाळी ९ वाजता पूर्ववेसपासून मोजणीस प्रारंभ झाला़
ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा म्हणणाऱ्या नेत्याने मागील मोजणीच्या वेळी हरकत घेतली होती़ या वेळीदेखील हरकत घेणार, असा अंदाज होता़ परंतु पोलिसांनी प्रथमच नोटीस बजावली असल्याने विरोध झाला नाही.
मोजणी अधिकारी भगत यांनी प्रथम निशाणी करून नंतर टोटो स्टेशनच्या साहाय्याने मोजणी केली़ शेवटची मोजणी नारायणगाव बस स्थानकाजवळ झाली़ सायंकाळी ४ वाजेपर्यंत मोजणी सुरू होती़
मोजणी संपण्याच्यावेळी खेड न्यायालयाने दिलेल्या तात्पुरता जैसे थे (स्टेटस को) चा आदेश उपसरपंच संतोष पाटे घेऊन आले़ मात्र तोपर्यंत मोजणी झाली होती. तसेच या मोजणीशी न्यायालयाच्या निर्णयाचा काहीएक संबंध नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली़ हा स्टेटस को फक्त अतिक्रमण कारवाई करू नये, यासाठी होता़
हद्दीचा नकाशा जोपर्यंत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. न्यायालयाने म्हणणे मागितले असून आमची हद्द असल्याचे पुरावे आल्यानंतर न्यायालयात ते सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोहेकर यांच्यासह बी. जी़ चौधरी, एस़ व्ही़ गणगणे, वाय. जी़ मळेकर यांच्यासह ३० कर्मचाऱ्यांनी मोजणी केली. ३० पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता़ (वार्ताहर)
सुनावणी पुढे ढकलली
नारायणगाव : येथील गाळा ताबा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दि़ ४ जानेवारी तर जुन्नर न्यायालयाने दि़ २८ डिसेंबर ही तारीख सुनावणीसाठी दिली आहे़ त्यामुळे निर्णय काय लागणार, अशी उत्कंठा नागरिकांमध्ये होती. परंतु कोणतीही सुनावणी न झाल्याने नागरिकांच्या उत्कंठेवर पाणी पडले़
शंकर व बाळू जाधव यांचा गाळा ताब्यात घेण्याप्रकरणी राजेंद्र शशिकांत हाडवळे, ग्रा़ पं़ सदस्य अमित राजेंद्र कोऱ्हाळे, शांताराम गणपत बरडे, अतुल किसन डेरे, स्वप्निल किसन डेरे, गौरव दिलीप पाटे, अनिकेत अविनाश कोऱ्हाळे, दिनेश दादाभाऊ शिंदे, साईनाथ रामचंद्र घोलप, नंदू खंडू अडसरे, दत्तात्रय हरिभाऊ तरडे, विनायक शंकर जाधव, कृष्णा सीताराम डेरे, रूपेश विलास खैरे, अक्षय नारायण खोकराळे, प्रणय दिलीप पाटे, सागर सुभाष डेरे, चंद्रकांत पांडुरंग अडसरे आदींना अटक होणार की नाही, अशी उत्कंठा सर्वांना होती; परंतु उच्च न्यायालयाने व जुन्नर न्यायालयाने पुढील तारीख दिल्याने निर्णय लांबला गेला आहे़