रूमवर अभ्यासासाठी गेल्यानंतर वाद, तरुणीचे जीवलग मित्रावरच चाकूने सपासप वार; जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:25 PM2024-04-13T13:25:50+5:302024-04-13T13:26:58+5:30
मित्रासमवेत झालेल्या वादावादीतून त्याच्यावर चाकूने सपासप वार...
पुणे : मित्राच्या रूमवर अभ्यासासाठी गेल्यानंतर मित्रासमवेत झालेल्या वादावादीतून त्याच्यावर चाकूने सपासप वार केलेल्या तरुणीला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
अनुजा महेश पन्हाळे असे जामीन मंजूर झालेल्या तरुणीचे नाव आहे. यात तिचा मित्र यशवंत मुंडे मयत झाला. ही घटना २९ एप्रिल २०२३ रोजी घडली. तरुणीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तरुणीच्या जामीन अर्जाला सरकारी वकील पी. पी. देवकर यांनी विरोध केला. मयत तरुण आणि आरोपी तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत. तरुणीकडे आधीपासूनच चाकू होता. त्यामुळे खून हा पूर्वनियोजित कट होता. रूमच्या बाहेरील पाऊल खुणा तिच्याच आहेत, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे तिला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
आरोपीचे वकील ॲड. सचिन ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की, आरोपी तरुणीवर २२ ऑगस्ट २०२३ला दोषारोपपत्र दाखल झाले आहे. सुनावणीमध्ये अजूनही कोणतीच प्रगती झालेली नाही. तिच्यावरचा दोषही सिद्ध झालेला नाही. सुनावणीला विलंब लागण्याची शक्यता आहे. आरोपी तरुणी ही १९ वर्षांची आहे. तिच्यावर पूर्वीचे कोणतेही गुन्हे नाहीत. आरोपी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तरुणीला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला.