पुण्यातील ट्राफिकवरून पोलीस अन् महापालिका आयुक्तांमध्ये वाद; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले
By नितीन चौधरी | Published: November 3, 2022 02:54 PM2022-11-03T14:54:02+5:302022-11-03T14:54:19+5:30
दोन आयुक्तांनी केलेला पत्रव्यवहार हा कागदावर आला आहे त्यावर विचार करू
पुणे : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, तरच वाहतूक कोंडी कमी होईल, अशी सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांना केल्यावर प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही आयुक्तांमध्ये वाद असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे नसल्याचे स्पष्ट केले. ''वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही परंतु परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घ्याव्या लागतील, दोन आयुक्तांनी केलेला पत्रव्यवहार हा कागदावर आला आहे त्यावर विचार करू,'' अशी सारवासारव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्यात काहीही वाद नाही. सरकारी कामात काही बाबी सांगण्यासाठी त्या कागदावर आणाव्या लागतात. तसे त्यांनी केले आहे. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस आयुक्तांना काही पर्याय सुचले आहेत. ते त्यांनी कागदावर मांडले आहेत. गेल्या बैठकीत पुण्यातील ४०० किलोमीटर रस्त्यांच्या कामांबाबत ठरले आहे. त्यानुसारच पोलीस आयुक्तांनी हे विषय पत्रातून मांडले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे अंमलबजावणीसाठी पत्र पाठवले आहे."
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बीआरटी मार्ग बंद करावा अशी सूचना केली आहे. त्यावर पाटील म्हणाले, "पुण्यातील वाहतूक कोंडीचे समर्थन करणार नाही. मुंबईतही वाहतूक कोंडी ही विविध विकास कामांमध्ये होत आहे. पुण्यातही मेट्रो, जायका, पाइपलाइनने गॅस असे प्रकल्प सुरू आहेत. विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामामुळे सहा लेनचा रस्ता तीन लेनचा झाला आहे. त्यामुळे कोंडी होत आहे. हे वाहतूक कोंडीचे समर्थ नाही. यावर उपाय म्हणून काय करणार आहोत याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, परिस्थितीमुळे तयार झालेली कोंडी लक्षात घ्यायला हवी."