दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 17:36 IST2025-04-08T17:36:25+5:302025-04-08T17:36:57+5:30
सुमारे ३५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या प्रेमीयुगुलाचाचे मृतदेह मिळून आले

दोघांमध्ये वाद! प्रेयसीची थेट पाण्यात उडी, तिला वाचवण्यासाठी प्रियकराचीही उडी, दोघांचा बुडून मृत्यू
घोडेगाव : कळंब टाकेवाडी (ता. आंबेगाव) जवळ डिंभे धरण डाव्या कालव्याच्या पाण्यात प्रेमीयुगुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. यात कविता सुनील पारधी (वय ३६, रा. टाकेवाडी ठाकरवाडी, ता. आंबेगाव) आणि पप्पू लक्ष्मण खंडागळे (३३, रा. जवळके बुद्रुक, ता. खेड) हे दोघे मयत झाले आहेत.
कविता व तिच्या मामाची मुलगी दिव्या हे दोघे पप्पूला भेटण्यासाठी टाकेवाडी येथे येत असताना गावाजवळ असलेल्या डाव्या कालव्याजवळ हे तिघे भेटले. यामध्ये कविता व पप्पू यांच्यात वाद झाला, यात कविताने पाण्यात उडी मारली व तिला वाचवण्यासाठी पप्पूने देखील पाण्यात उडी मारली. काही वेळात हे दोघेही कालव्याच्या पाण्यात दिसेनासे झाले. सोबत असलेल्या दिव्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आवाज दिला. यावेळी जवळच असलेल्या रामदास चिखले यांना तिने सांगितले. त्यांनी पोलिस पाटील उल्हास चिखले, उपसरपंच समीर काळे, राहुल चिखले, भानुदास चिखले, रवींद्र काळे, शांताराम चिखले, विशाल चिखले व ग्रामस्थांना कळवले. सर्वांनी मिळून घटनास्थळापासून जवळपास दहा किलोमीटरपर्यंत कविता व पप्पूचा शोध घेतला; पण हे दोघे मिळून आले नाही.
पोलीस पाटील यांनी मंचर पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली. कालव्यातून सुमारे चारशे क्युसेक पाणी सुरू असल्याने या दोघांचा शोध लागणे अवघड होत होते. ही घटना तहसीलदार रवींद्र नागटिळक यांना कळविण्यात आली. त्यांनी कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांना कळवून कालव्याचे पाणी कमी करण्याची विनंती केली. कालव्याचे पाणी कमी झाल्यानंतर कळंब गावच्या हद्दीत कविता पारधी हिचा मृतदेह सापडला तर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत पप्पू खंडागळे याचा मृतदेह मिळून आला. सुमारे ३५ तासांच्या अथक परिश्रमानंतर या दोघांचे मृतदेह मिळून आले. या दोघांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, याचा तपास मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.