नवऱ्यासोबत भांडण; निवडला जीवन संपवण्याचा मार्ग, महिलेचे दामिनी मार्शलने वाचवले प्राण
By नितीश गोवंडे | Updated: January 9, 2025 16:08 IST2025-01-09T16:07:39+5:302025-01-09T16:08:07+5:30
टोकाचे पाऊल उचलण्यागोदर महिलेने ओळखीच्या दामिनी मार्शल हिंगे यांना फोन करून आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्याने प्राण वाचले

नवऱ्यासोबत भांडण; निवडला जीवन संपवण्याचा मार्ग, महिलेचे दामिनी मार्शलने वाचवले प्राण
पुणे: बुधवारी दुुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी शिवाजीनगर येथील दामिनी पथकातील मार्शल हिंगे यांच्या मोबाईलवर एक फोन येतो. त्यांच्या ओळखीच्या महिलेने तो फोन करत, ‘मी आत्महत्या करत आहे’ असे सांगत फोन कट केला. पुढच्याच क्षणाला हिंगे यांनी भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव यांना फोनद्वारे ही माहिती दिली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रियंका बागुल यांना लोकेशन काढण्याचे आदेश दिले. बागुल यांनी काढलेले लोकेशन मार्केटयार्ड परिसरात दिसून आले. त्यानंतर, तात्काळ मार्केटयार्ड दामिनी मार्शलला याबाबत सांगण्यात आले. त्यांनी शोध घेण्यास सुरूवात केली, तेवढ्यात महिलेचे लोकेशन पर्वती परिसरात दिसून आले. त्यानंतर पर्वती, पर्वती दर्शनच्या दामिनी मार्शल, स्वारगेट दामिनी मार्शल कडून महिलेचा शोध घेण्यास सुरूवात झाली. शेवटी ती महिला पर्वती पायथ्याला मिळून आली. दामिनी मार्शलच्या तत्परतेमुळे संबंधित महिलेचे प्राण वाचले.
नवऱ्या सोबत झालेल्या किरकोळ भांडणातून महिलेने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा मार्ग निवडला होता. आत्महत्येपूर्वी तीने ओळखीच्या दामिनी मार्शल हिंगे यांना फोन करून आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्याने तिचे प्राण वाचले. यानंतर संबंधित महिलेला दामिनी मार्शल शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घेऊन आले. तिच्या पतीला बोलवून घेत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी महिलेचे व तिच्या पतीचे समुपदेशन केले. त्यानंतर महिलेला तिचे मामा-मामी, पती आणि इतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रियंका बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर दामिनी मार्शल हिंगे, पर्वती दामिनी मार्शल सपकाळ, पर्वती दर्शन मार्शल भरगुडे व ठाकरे, जनता वसाहत मार्शल पोलिस कर्मचारी चव्हाण व मंडलिक, स्वारगेट दामिनी मार्शल धायतडक, मार्केटयार्ड दामिनी मार्शल घाडगे यांनी केली.