टपरीचालकाबरोबर वाद; ग्राहक सेवा केंद्राला धडक, ९ जणांना चिरडण्याअगोदर डंपरचालकाचे पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:56 IST2024-12-25T11:55:46+5:302024-12-25T11:56:00+5:30
डंपरचालकाने मद्यधुंद अवस्थेत बाइफ रोडवरील टपरीचालकाबरोबर वाद घातला, तेथून पुढे केंद्राला धडक, मग हायवेवर आला

टपरीचालकाबरोबर वाद; ग्राहक सेवा केंद्राला धडक, ९ जणांना चिरडण्याअगोदर डंपरचालकाचे पराक्रम
वाघोली : केसनंद फाटा येथे मध्यरात्री झोपलेल्या ९ जणांना चिरडण्याअगोदर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तोटरे नामक डंपरचालकाने बाइफ रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेजारील ग्राहक सेवा केंद्र या दुकानाला जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे.
डंपरच्या धडकेमध्ये दुकानाच्या शटरचे व भिंतीचे नुकसान झाले आहे. बँकेच्या शेजारी असणाऱ्या या दुकानाचे व घराचे रिनोव्हेशनचे काम सध्या सुरू आहे. दुकानाला दिलेल्या धडकेबाबत सकाळी दुकानदार यांना समजले तसेच केसनंद फाटा येथे डंपरने ९ जणांना चिरडल्याचे समजले. याच डंपरचा पुढील बाजूकडील असणारा आरसा दुकान परिसरात सापडला आहे तसेच शटर, भिंतीचा रंगदेखील डंपरवर दिसून आला आहे. याबाबत खात्री झाल्यानंतर दुकानाच्या नुकसानीबाबत दुकानदाराने पोलिसांना कळवले आहे. डंपरचालकाने मद्यधुंद अवस्थेत बाइफ रोडवरील टपरीचालकाबरोबर वाद घातला असल्याचे नागरिकांनी सांगितले. तेथून पुढे दुकानाला धडक दिली व डंपर घेऊन हायवेवर आला. त्यानंतर केसनंद फाटा येथे झोपलेल्या कुटुंबाला चेंगरण्याची दुर्दैवी घटना घडली.
सलग दुसऱ्या दिवशी डंपर धडकला; तरुण गंभीर
वाघोलीतील केसनंद फाटा परिसरामध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याची घटना घडली असतानाच दुसऱ्याच दिवशी पहाटे डंपरचा अपघात झाल्याची घटना वाघोलीतील लोहगाव चौक परिसरात घडली आहे. यामध्ये दुचाकी व डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार साईराज देशमुख हा जखमी झाला असून, दुचाकीचे नुकसान झाले आहे.