औरंगाबादचे अर्जुन अन् भक्ती आता झाले पुणेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:24+5:302021-08-17T04:15:24+5:30
पुणे : औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघाची जोडी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली आहे. त्याबदल्यात पुण्याहून दोन नीलगाई औरंगाबादला ...
पुणे : औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघाची जोडी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात दाखल झाली आहे. त्याबदल्यात पुण्याहून दोन नीलगाई औरंगाबादला देण्यात आल्या आहेत. या देवाण-घेवाणीला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानुसार आता पुणेकरांना अर्जुन आणि भक्ती या जोडप्याचे दर्शन प्राणिसंग्रहालय खुले झाल्यावर हाेणार आहे. आता प्राणिसंग्रहालयात एकूण ८ वाघ झाले आहेत.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाने दोन वाघांची मागणी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाकडे केली होती. प्राधिकरणाने याबाबत औरंगाबादला विचारणा केली. तिथे वाघांची संख्या ११ आहे. त्यामुळे त्यांनी लगेच मान्यता दिली. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी पुण्याला हे वाघ पाठविण्यात आले. हे वाघ आता काही दिवस पुण्यात योग्य देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. कारण, त्यांना पुण्याचे वातावरण मानवते की नाही, ते पाहण्यासाठी संपूर्ण वेळ लक्ष ठेवावे लागणार आहे.
==========================
पिंजऱ्यात जायला अर्जुनने लावले चार तास...
अर्जुन हा ७ वर्षांचा वाघ असून भक्ती ही ५ वर्षांची आहे. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर अर्जुन पिंजऱ्यात शिरला. औरंगाबाद प्राणिसंग्रहालयातील त्याला सांभाळणारे कर्मचारीही भावूक झाले होते. पिंजरे पाहून अर्जुन त्यात जायलाच तयार होत नव्हता. सुमारे १२ कर्मचारी त्याला पिंजऱ्यात बसविण्यासाठी प्रयत्न करत होते. दोन वेळा त्याने दोरही तोडला. शेवटी चार तासांनंतर तो पिंजऱ्यात गेला. अर्जुन पिंजऱ्यात गेल्यानंतर भक्ती लगेच पिंजऱ्यात गेली. यापूर्वी औरंगाबादहून २०१५ मध्ये पांढरा वाघ आणि एक वाघीण पुण्याला दिली होती.
============================
वाघांचा पहिला दिवस छान
अर्जुन आणि भक्ती पुण्यात आल्यानंतर दोघांचीही तब्येत चांगली असून, ते इथं व्यवस्थित राहत आहेत. पहिला दिवस त्यांचा छान गेला. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात यापूर्वी ६ वाघ होते. त्यात आता या दोघांची भर पडल्याने एकूण ८ वाघ झाले आहेत.
========================
रिध्दी वाघिणीचे आकाश, सार्थक, पार्थ, गुरू हे चार बछडे आहेत. तर एक पांढरा वाघ आहे. आणि आता अर्जुन, भक्ती मिळून आठ वाघ झाले आहेत.