जुन्या भांडणाच्या रागातून तिघांवर सशस्त्र हल्ला
By admin | Published: March 29, 2017 11:41 PM2017-03-29T23:41:55+5:302017-03-29T23:41:55+5:30
हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक
बारामती : हॉटेलवर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ३ जणांनी तलवार, कोयता, सत्तूर या घातक शस्त्रांनी हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला. इतर तिघांवर वार करून हल्लेखोर फरार झाले. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले. आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट, ३०७ व आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माळेगाव येथील यश गार्डन या हॉटेलात जेवणावरून प्रकाश हनुमंत अडागळे व विशाल सर्जेराव अडागळे यांची हॉटेल मालक प्रशांत मोरे यांच्यासोबत वाद झाला. आज सकाळी साडेअकराला गजबजलेल्या शिवाजी चौकात प्रशांत मोरे, विनोद (टॉमी) मोरे, सारंग शिंदे (सर्व रा. शिवनगर, माळेगाव) यांनी प्रकाश अडागळे हे मित्रासमवेत थांबले असता प्रशांत मोरे याने जातीवाचक बोलून ‘मी तुला भीत नाही,’ असे म्हणून तलवारीने डोक्यात, विनोद (टॉमी) मोरे याने सत्तूरने उजव्या दंडावर, तर सारंग शिंदे याने कोयत्याने गंभीर वार केले. तर, ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या राहुल अडागळे, कुणाल सकट व सुनील खिलारे यांना
मारहाण करून हे तिन्ही आरोपी हत्यारे उंचावत गावातून फरार झाले.
काही जणांनी प्रकाश अडागळे
यांना जखमी अवस्थेत बारामती येथे खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले आहे. जखमीची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
फरार आरोपींवर अॅट्रॉसिटी अॅक्ट, खुनाचा प्रयत्न करणे व आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माळेगाव पोलीस दूरक्षेत्रासाचे उपनिरीक्षक सी. बी. बेरड हे अधिक तपास करीत आहेत.
(वार्ताहर)
माळेगावला जादा पोलिसांची गरज....
शांतताप्रिय माळेगाव गटा-तटातील भांडणामुळे बदनाम झाले आहे. या गावात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारी मोडीत काढली जाईल, असे तालुका पोलीस निरीक्षक एस. आर. गौड यांनी सांगितले. मात्र, दोन-तीन महिन्यांपासून सातत्याने माळेगावात दोन गटांमध्ये मारामारीचे प्रसंग घडत आहेत. त्यामध्ये धारदार शस्त्रांचा काठ्या, लोखंडी गज आदींचा वापर केला जातो. त्यामुळे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या माळेगावमध्ये स्वतंत्र पोलीस ठाण्यासह अतिरिक्त पोलीस बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात शैक्षणिक संकुलामुळे बाहेरगावचे विद्यार्थीदेखील मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या गावची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.