हप्ता दिला नाही म्हणून पुण्यात सशस्त्र हल्ला, सराईत गुन्हेगारासह १६ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 02:50 PM2023-10-07T14:50:37+5:302023-10-07T14:51:07+5:30
ही घटना आंबेगाव येथील शनिनगरमध्ये गुरुवारी घडली....
धनकवडी (पुणे): किराणा दुकानदाराने हप्ता दिला नाही म्हणून त्याच्या कुटूंबावर सराईत गुन्हेगारासह तब्बल सोळा जणांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दुकानदाराच्या कुटूंबातील पाच व्यक्ती जखमी झाल्या असून भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना आंबेगाव येथील शनिनगरमध्ये गुरुवारी घडली.
याप्रकरणी अमृता श्रीनिवास शिंदे( वय ४८) यांनी तक्रार दिली. त्यानुसार विनोद सोमवंशी, भुषम भांडवलकर, जावेद शेख, आकाश कांबळे, तुषार कुचेकर, आदित्य नाईक, गोविंद लोखंडे, तेजस उर्फ राम वाडेकर, सुरज बांदल, प्रविण गुडे, राहुल शिरसाठ ,मृणाल जाधव, अभिषेक भगुरे आणि इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिनगर येथे श्री गणेश सुपर मार्केट आहे. या दुकानाच्या ताराराम देवाशी यास सराईत गुन्हेगार विनोद सोमवंशी याच्या सांगण्यानुसार भुषण भांडवलकर आणि जावेद शेख यांनी हप्ता मागितला होता. ताराराम यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता, दोघांनी त्यास शिवीगाळ केली. फिर्यादीने त्यांना तसे करु नका असे समजावून सांगितले. यानंतर आरोपी माघरी फिरुन पुन्हा त्यांचे साथीदारांसह हत्यारे घेऊन आले. त्यांनी फिर्यादीचा मुलगा रोहित यास तुला आता खल्लासच करतो असे म्हणत डोक्यात वार करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांचा तसेच फिर्यादी यांचा पुतण्या वेदांत, रोहित तसेच मेव्हणा प्रविण अंकुश यानांही मारहाण केली. जाताना दरवाजे आणि खिडक्यांवर दगडफेक करुन तोडफोड केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमरकर करत आहेत.