उरुळी कांचनमधील बिवरी येथे घरावर सशस्त्र दरोडा; १६ लाखांचे दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 12:55 PM2024-04-03T12:55:27+5:302024-04-03T12:55:47+5:30
घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देऊन अंगावरील दागिने ओढून काढून घेतले
उरुळी कांचन: बिवरी ता. हवेली जि. पुणे येथे मंगळवारी (ता. ०२) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १६ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली आहे.
बिवरी हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले गाव आहे. शहर पोलिसांसमोर या ग्रामीण भागामध्ये घडलेल्या या घटनेतील आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान आहे. याप्रकरणी प्रशांत विलास गोते (वय ४०) रा. बिवरी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दरडोखरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रशांत गोते आणि त्यांचे कुटुंब रात्री जेवण करून घरामध्ये झोपले असता मध्यरात्री पावणेदोन च्या सुमारास सात अनोळखी व्यक्ती त्यांच्या घराजवळ आल्या. त्यांनी मुख्य दरवाजा कटावणीने तोडून उघडला व शस्त्रासह आत घुसले आवाजाने सर्व कुटुंब जागे झाले परंतु सर्व कुटुंबीयाना चाकू व शस्त्राचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. दरोडेखोरांनी घरातील बेडरूम मधील कपाटातून ५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. घरातील महिलांना गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देऊन अंगावरील दागिने ओढून काढून घेतले. तसेच त्यांच्या बहिणीला मारहाण करण्यात आली आईला तोंडाला जबर मारहाण करून कानाला तोंडाला दुखापत दरोडेखोरांनी केली. घरातील व्यक्तींनी पोलिसांना फोन करू नये म्हणून सर्वांचे मोबाईल फोडून टाकले दरोडेखोरांनी १६ लाख ३० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडा घालून चोरून नेली व आरोपी पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांना व पोलीस पाटील यांना फोन करावा. - पोलीस पाटील बिवरी ,सागर गोते.