लष्करापुढे आधुनिकीकरणाचे आव्हान : मायकल मॅथ्यूज; लष्करी महाविद्यालयाचा २३७वा स्थापना दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:45 AM2017-11-16T11:45:13+5:302017-11-16T11:50:43+5:30
लष्करी महाविद्यालयाचा २३७ वा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा होत आहे. यानिमित्त विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज यांनी संवाद साधला.
पुणे : आजच्या काळात लष्कराला आघाडी घेण्यासाठी विविध साधनांची गरज भासते. ती पुरविण्याची जबाबदारी ‘इंजिनिअर कोअर’ची आहे. सध्या लष्कराला लागणार्या शस्त्रास्त्रांचे; तसेच साधनांचे आधुनिकीकरण, तिन्ही दलाला लागणार्या पायाभूत सुविधांचा विकास; तसेच सीमेवरील रस्त्यांची बांधणी हे सर्वांत मोठे आव्हान आहे, असे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्यूज यांनी सांगितले. लष्करी महाविद्यालयाचा २३७ वा स्थापना दिवस शुक्रवारी साजरा होत आहे. यानिमित्त विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, युद्धादरम्यान लष्कराला वेगवान हालचाली, तसेच अनेक अडथळे दूर करण्यासाठी विविध संसाधनांचा आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा करावा लागतो. यासाठी अभियांत्रिकी विद्यालयात अभियंत्यांना प्रशिक्षित केले जाते.
सद्य:स्थितीत लष्करासमोर असलेल्या आव्हानाबाबत मॅथ्यूज म्हणाले की, लष्कराकडे सध्या उपलब्ध असलेल्या साधनांचे आणि आधुनिकीकरण करणे महत्त्वाचे आहे. आतापर्यंत फक्त३० ते ४० टक्के लष्करी आस्थापना उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काळात ही तूट भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. सीमावर्ती भागात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते उभारणीचे काम सुरू आहे.
हे रस्ते बांधताना वातावरणाचा सर्वाधिक अडथळा येतो. केवळ चार ते पाच महिने रस्त्यांची कामे करायला मिळतात. भविष्यात या समस्या सोडविण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू आहे.
‘सीएमई’मध्ये होणार राष्ट्रीय रोइंग स्पर्धा
विविध क्रीडाप्रकारांना प्रोत्साहान देण्यासाठी लष्करी महाविद्यालयात सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून जवळपास २००० हजार मीटरचा आंतरराष्ट्रीय मानांकन असलेला रोइंग चॅनल या ठिकाणी बांधण्यात आला आहे. पुढील महिन्यात या ठिकाणी राष्ट्रीय रोइंग स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे मॅथ्यूज यांनी सांगितले.
भूसुरुंग शोधण्याचा थरार
युद्धात लष्कराचा वेग कमी करण्यासाठी, तसेच रणगाडे उडविण्यासाठी शत्रुतर्फे भूसुरुंग; तसेच रणगाडाविरोधी स्फोटके पेरली जातात. हे भूसुरुं ग शोधण्याचे काम आव्हानात्मक असते. युद्ध; तसेच शांतता काळात ती कशी शोधली जातात या बरोबरच वाटेत येणार्यां नद्या, तसेच उंच सखल डोंगर कसे पार करतात याची चित्तथरारक प्रात्यक्षिके या वेळी दाखवण्यात आली.
भूसुरुंग शोधण्यासाठी; तसेच ते जमिनीत पेरण्यासाठीचे तंत्रज्ञान आणि यंत्रे अभियांत्रिकी महाविद्यालयात बनवण्यात आली आहे. रणगाड्याच्या पुढे लोखंडी चाके लावून ती भूसुरुंगावरून ती आधी नष्ट करण्यात आली. डीआरडीओतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘आरोही’ या रोबोटद्वारे स्फोटके कशी शोधली, आणि ती कशी नष्ट केली जातात याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
नद्या; तसेच उंच सखल परिसर पार करण्यासाठी आर्मी अभियांत्रिकी महाविद्यालय; तसेच डीआरडीओतर्फे विकसित केलेले पूल कसे कार्य करतात, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एएम५० व भारतीय बनावटीचे ‘सर्वत्र’ हा पूल युद्धकाळात कशापद्धतीने वापरला जातो, याचेही सादरीकरण या वेळी केले.
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन केंद्राला मान्यता
संशोधनाला चालना देण्यासाठी लष्करी अभियांत्रिकी विद्यालयातील केंद्राला मान्यता देण्यात आली आहे. या केंद्राला पुणे विद्यापीठाचीही मान्यता मिळाली आहे. सध्या महाविद्यालयातील २१ अधिकार्यांना डॉक्टरेट मिळाली असून, ते मार्गदर्शन करण्यासाठी पात्र झाले आहेत. यामुळे लष्करातील अधिकार्यांना पुढील संशोधन करण्यासाठी लागणार्या सोई-सुविधा, तसेच मार्गदर्शन विद्यालयातच मिळणे शक्य होणार आहे.