Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 02:26 PM2024-07-25T14:26:12+5:302024-07-25T14:26:55+5:30
अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एकतानगरी आणि निंबजनगर भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसायटीमध्ये घराघरात पाणी शिरल्याचे दिसून आले आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले जात आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सिंहगड रोड परिसरात एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत.
एकतानगरी आणि निंबजनगर भागात प्रशासनाकडून बोटीच्या सहाय्याने नागरिकांना बाहेर काढले जात आहे. अग्निशमन विभागाकडून योग्य ती खबरदारी घेऊन बोट, रश्शी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग अशा विविध उपकरणांचा वापर करत नागरिकांना सुरक्षित स्थळी आणले जात आहे. ११ वाजेपर्यंत अग्निशमन दलाने जवळपास १६० नागरिकांची सुखरुप सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. सिंहगड रस्ता निंबज नगर भागातून ७० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. निंबजनगर परिसरातील सोसायटी व सिंहगड रोड वरील सोसायट्या मध्ये पाणी शिरल्याने घरात लोक अडकलेली असताना त्यांना खाद्य पदार्थ आणि पाणी इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.
आता अग्निशमन आणि एनडीआरएफ या दोन्ही जवानांच्या मदतीने नागरिकांची सुटका केली जात आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच खडकवासला धरणातून विसर्ग सुरु असल्याने पाणी बघण्यासाठी अथवा वर्षाविहारासाठी कोणीही पुलांवर जाऊ नये असेही सांगण्यात येत आहे.