तामिळनाडुतून फुटला आर्मी रिलेशन परीक्षेचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:23+5:302021-03-09T04:14:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेच्या लेखी परिक्षेची प्रश्न पत्रिका तामिळनाडुतून लिक झाल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेच्या लेखी परिक्षेची प्रश्न पत्रिका तामिळनाडुतून लिक झाल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले असून तामिळनाडूतील मेजर दर्जाच्या लष्करी अधिकाऱ्याने ही प्रश्नपत्रिका फोडल्याचे निष्पन्न झाले आहे.
थिरु मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. लेक व्हिव्यु, ऑफिसर्स एन्कलेव्ह, वेलिंग्टन, जि. निलीगरी, तामिळनाडु) या मेजरला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले असून त्यात १० जणांना अटक करण्यात आली आहे.
आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेच्या लेखी परिक्षा २८ फेब्रुवारी रोजी होती. त्याअगोदर परिक्षार्थींना पेपर पुरविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती आर्मीच्या गुप्तचर विभागाला मिळाली. गुप्तचर विभाग व पुणे पोलीस यांनी पुण्यातील विश्रांतवाडी, घोरपडी, बारामती येथील माळेगाव येथे छापे टाकून परिक्षार्थींना प्रश्नपत्रिका पुरविणार्यांना अटक केली. यातील सेवानिवृत्त लष्करी अधिकारी भारत अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा) याच्याकडे ही प्रश्नप्रत्रिका आली होती. याचे दोन साथीदार कुमार परदेशी (रा. फलटण, ता. सातारा) आिण योगेश शंकर गोसावी (रा. माळेगाव, ता. बारामती) हे दोघे फरार आहेत.
अटक केलेल्या ५ जणांकडे केलेल्या तपासात अडकमोळ याच्याकडे ही प्रश्नपत्रिका आली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याला ती तामिळनाडुतील मेजर थिरु याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी थिरु याला रविवारी तामिळनाडुतून अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी सांगितले की, आरोपीनी आर्मी रिलेशन भरती प्रक्रियेचा लेखी परिक्षा पेपर लिक करुन तो संपर्कातील उमेदवारांना देण्याच्या उद्देशाने वितरीत केला. भारत अडकमोल याला लेखी परिक्षेची प्रश्न पत्रिका थिरु थंगवेल याने मोबाईलवरुन व्हॉटसॲपद्वारे पाठविली होती. दोघांनीही त्यांच्या मोबाईलवरील व्हॉटसॲपद्वारे केलेले संभाषण डिलीट केलेले आहे. याबाबत आरोपीकडे तपास करुन पुरावा गोळा करावयाचा आहे. थिरु थंगवेलू याला प्रश्नपत्रिका कोणाकडून मिळाली याबाबत तपास करुन त्यांची नावे निष्पन्न करावयाची आहेत. थंगवेलू याने अजून कोणाकोणाला ही प्रश्नपत्रिका वितरीत केली आहे, याचा तपास करावयाचा आहे. थिरु थंगवेलू आणि भारत अडकमोल यांच्यात काय व्यवहार झालेला आहे.
दिल्ली कनेक्शनची शक्यता
लष्कराला ही लेखी परिक्षा प्रश्नपत्रिका लिक झाल्याने रद्द करावी लागली होती. त्यामुळे लष्कराने हा संपूर्ण प्रकार गांभीर्याने घेतला आहे. आर्मीने त्यांच्या पातळीवरही याची चौकशी सुरु केली आहे. यासंबंधात दिल्लीमध्येही छापेमारी केल्याचे सांगण्यात येते. ही प्रश्नपत्रिका फुटण्यामागे दिल्ली कनेक्शन असल्याची चर्चा सुरु झाली आहे.