ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी तब्बल सोळा अधिका-यांची फौज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 03:45 PM2021-04-18T15:45:14+5:302021-04-18T15:46:04+5:30
जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचा आदेश
पुणे: शहरी भागासह आता ग्रामीण भागात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच रुग्णांचे हाॅस्पिटलमध्ये दाखल होण्याचे व त्यांना लागणा-या ऑक्सीजन व रेमडेसिविर व अन्य औषधांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक हाॅस्पिटला तीन-चार दिवस ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली तरी ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी स्वतंत्र आदेश काढून ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर लक्ष ठेऊन ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल १६ वरिष्ठ अधिका-यांची फौज नियुक्त केली आहे.
जिल्हाधिकारी देशमुख यांनी आपल्या आदेशात पुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात कोरोना (कोविड १९) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करणेसाठी मोठ्याप्रमाणात कोविड केअर सेंटर, कोविड हाॅस्पिटल, जम्बो कोविड हाॅस्पिटलसह खाजगी हाॅस्पिटल कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सिलेंडर्स त्याचप्रमाणे सक्षम यंत्रणा व पाईपलाईन करण्यात आलेली आहे. कोविड रुग्णांवर वैद्यकीय उपचारा दरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली तरी केवळ ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर उशीर होत असल्याने हाॅस्पिटलला वेळेवर ऑक्सीजन पुरवठा होत नसल्याचे समोर आले. याच साठी जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग पुरवठा करणा-या १६ वितरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेच शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.